युद्धाचं सावट! भारताकडून 2700 कोटींच्या शस्त्रास्त्रे खरेदीला तातडीची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 02:51 PM2019-02-27T14:51:19+5:302019-02-27T14:57:31+5:30
संरक्षण खरेदी परिषदे(डीएसी)नं बुधवारी 2700 कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीला मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली- संरक्षण खरेदी परिषदे(डीएसी)नं बुधवारी 2700 कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीला मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची एक बैठक झाली. या बैठकीत डीएसीनं संरक्षण सामग्री खरेदी करण्याच्या निर्णयाला तातडीनं मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत भारतीय नौसेनेसाठी तीन कॅडेट प्रशिक्षण युद्धनौका खरेदी करण्यात येणार आहेत.
या युद्धनौकेच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्यांसह कॅडेट अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. ही युद्धनौका चिकित्सा सेवा, मनुष्य सहाय्यता आणि आपत्कालीन मदत देण्यासाठी सक्षम आहे. तसेच युद्धनौकेद्वारे याशिवाय बचावकार्य आणि सर्च ऑपरेशन राबवता येणार आहे. राजस्थानातल्या गंगानगर जिल्ह्याला लागून असलेल्या पाकिस्तानमधील सीमारेषेत पाकिस्ताननं सैन्यबळ वाढवलं आहे. तसेच बीकानेरच्या जवळपासच्या भागातील सैन्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. पाकिस्ताननं सिंध भागातील तीन मोठ्या एअरबेसवरून लढाऊ विमानांची उड्डाणं वाढवली आहेत. ज्यात कराचीहून जेएफ 17 थंडर, शाहबाजमधून एफ 16 आणि न्यू छोर एअरबेसमधून एफ 16सारख्या लढाऊ विमानांनी भरारी घेतली आहे. पाकिस्तानातील नियंत्रण रेषेतील 10 किलोमीटर आतपर्यंत हवाई क्षेत्रात लढाऊ विमानं सराव करत आहेत. तसेच बहावलपूरमधील पाकिस्तानी सैन्याच्या 31 कोरच्या इन्फ्रंट्री, मॅकेनाइज्ड व आर्म्ड फोर्सेसचीही ये-जा वाढली आहे. नियंत्रण रेषेवरही वातावरण शांत आहे.
पाकिस्तानी सेनेच्या 31 कोरजवळ राजस्थान आणि पंजाब भाग आहे. बीकानेर क्षेत्रातील बहावलपूर आणि जैसलमेरपासून जवळच असलेल्या पाकिस्तानच्या सीमा रेषेमध्येही सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दलानं हाय अलर्ट दिला असून, नियंत्रण रेषेवर लष्कर वाढवण्यात आलं आहे. भारतीय नियंत्रण रेषेवर हेरगिरीसाठी ड्रोन आणि यूएव्ही उडवले जात आहेत. कालच भारतानं कच्छच्या क्षेत्रात पाकिस्तानचे ड्रोन पाडले होते. भारतीय गुप्तचर यंत्रणांचीही परिस्थितीवर नजर आहे. समुद्री सीमेतील बंदरगा, नवलखी आणि पायक्रिकसह पूर्ण क्षेत्रात हाय अलर्ट दिलं आहे. सीमवर्ती भागात जवान तैनात करण्यात आले आहेत.
उत्तर भारतात अलर्ट! लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट आणि चंदीगड विमानतळ बंद
भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून, भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने आज सकाळी हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात दक्षतेचे आदेश देण्यात आले असून, लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट आणि चंदीगड विमानतळ सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.