...तर पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक
By admin | Published: January 14, 2017 05:26 AM2017-01-14T05:26:12+5:302017-01-14T05:26:12+5:30
सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आम्ही जम्मू आणि काश्मिरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो, असा दावा
जम्मू : सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आम्ही जम्मू आणि काश्मिरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो, असा दावा करतानाच, गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करण्यास भारतील जवान सज्ज आहेत, असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी येथे केले.
जम्मू व काश्मीरमधील स्थितीविषयी ते म्हणाले की, पाकिस्तान कसे वागतो, यावर सारेकाही अवलंबून आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेवून आहोत. आम्हाला शांतता हवी आहे. मात्र पाकिस्तानने कागाळी केली, तर त्यास उत्तर देण्यास आमचे जवान तयार आहेत. पाककडून सुरू असणाऱ्या छुपे युद्ध, घुसखोरी, दहशतवाद या समस्या लगेच संपतील, असे समजण्याचे कारण नाही. तसे व्हायला अनेक वर्षे लागतील. त्यामुळे लष्कराला सतत सतर्क राहावेच लागेल, असेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
थेट माझ्याकडे तक्रार करा
निमलष्करी दलाच्या काही जवानांसह सैन्याच्या जवानानेही ‘सोशल मीडिया’द्वारे आपल्या समस्यांचा पाढा वाचल्याच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल विपीन रावत यांनी लष्करी मुख्यालयांतील सल्ला-तक्रार पेटीद्वारे थेट माझ्याकडे म्हणणे मांडावे, असे आवाहन सैनिकांना केले आहे.
लष्करी जवानाने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून सैनिकांचा अधिकाऱ्यांचे सहायक म्हणून उपयोग करण्यात येत असल्याबद्दल टीका केली होती. रावत यांनी सहायक ही श्रेणी लष्कराचे महत्त्वपूर्ण अंग असल्याचे स्पष्ट केले.