Surgical Strike Video: भारतीय जवानांनी PoK मध्ये शिरून 'असा' केला होता दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 08:01 AM2018-06-28T08:01:43+5:302018-06-28T10:09:13+5:30
गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
नवी दिल्ली- गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. सर्जिकल स्ट्राइकमध्ये भारतीय लष्करानं रॉकेट लाँचर, मिसाइल आणि छोट्या शस्त्रास्त्रांनी हल्ला चढवला होता. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमधल्या भारतीय लष्कराच्या तळावर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हे सर्जिकल स्ट्राइक करण्यात आलं होतं. पाकिस्ताननं उरी सेक्टरमध्ये 18 सप्टेंबर 2016ला हल्ला केला होता. त्याच्या 11 दिवसांनंतरच सर्जिकल स्ट्राइक करण्यात आलं होतं. 29 सप्टेंबर 2016ला भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सीमेत तीन किलोमीटर आतपर्यंत घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. त्याच दरम्यान भारतीय लष्करानं पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या कॅम्पना नेस्तनाबूत केलं. पाकिस्तान सीमेवर असलेल्या या लाँचिंग पॅडला भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केलं होतं. (सौजन्य- इंडिया टीव्ही )
'भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने संपूर्ण परिसराला घेरलं होतं. सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून नेण्यात आले. जवळच्या गावांमध्ये हे सर्व मृतदेह दफन करण्यात आल्याचंही समोर आलं होतं. रात्री दोन वाजल्यापासून ते पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत म्हणजे तीन ते चार तास हल्ला सुरू होता', असंही प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. सीमेजवळच्या गावातील भारतीय नागरिकांचे काही नातेवाईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतात. नियंत्रण रेषेपासून 4 किमी अंतरावरील दुधनियाल या खेडेगावातील मुख्य बाजारातून दोन प्रत्यक्षदर्शींनी काही इमारती आगीत भस्मसात झाल्याचे पाहिले. येथील अलहवाई ब्रिज शेवटचे ठिकाण आहे जिथे दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यापूर्वी सर्व साहित्य पुरवले जाते.
मध्यरात्री या भागात गोळीबार आणि स्फोटाचे मोठे आवज झाल्याचे प्रत्यशदर्शीनी स्थानिकांच्या हवाल्याने सांगितले. रात्री गोळीबाराच्या आवाजामुळे येथील लोक घरा बाहेर पडले नाहीत, त्यामुळे त्यांनी भारतीय जवानांना पाहिले नाही. पाच ते सहा मृतदेह ट्रकमध्ये भरून चालहाना येथील लष्कर-ए-तोयबाच्या तळावर नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दहशतवाद्यांनी सीमेचे संरक्षण करण्यात कमी पडल्याबद्दल पाकिस्तानी लष्कराला दोष दिला. भारताच्या या कारवाईमुळे मात्र लष्कर आणि अन्य दहशतवादी गटांना मोठा धक्का बसला होता.