आश्चर्य ! जेट एअरवेजच्या विमानात जन्मलं बाळ
By admin | Published: June 18, 2017 06:20 PM2017-06-18T18:20:51+5:302017-06-18T18:20:51+5:30
जेट एअरवेजच्या दमन ते कोची असा प्रवास करणा-या विमानात एका गर्भवती महिलेनं बाळाला जन्म दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - ट्रेनमध्ये बाळाचा जन्म झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्याच असतील, मात्र आता एका मातेनं चक्क विमानात बाळाला जन्म दिला आहे. विश्वास बसत नाही ना, मात्र हे खरं आहे. जेट एअरवेजच्या दमन ते कोची असा प्रवास करणा-या विमानात एका गर्भवती महिलेनं बाळाला जन्म दिला आहे.
या महिलेला विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळानं जोरजोरात प्रसूती कळा येऊ लागल्या. त्यामुळे विमानातील कर्मचा-यांची एकच धावपळ उडाली. विमानात कोणीही डॉक्टर नव्हता. मात्र केरळ राज्यातील एक नर्स याच विमानातून प्रवास करत होती. त्या नर्सच्या मदतीने विमानातील महिला कर्मचाऱ्यांनी विमानातच या महिलेची प्रसूती पार पाडली. जेट एअरवेजच्या कर्मचा-यांनी तात्काळ निर्णय घेत सौदी- केरळ विमानाचं मुंबईत लँडिंग केलं. तसेच नवजात बाळ आणि त्याच्या मातेला रुग्णालयात दाखल केले.
या महिलेने विमानात गोंडस बाळाला जन्म असून, आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. बाळ आणि मातेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर विमानाने कोचीकडे उड्डाण केले आहे. मोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या विमानात जन्मलेल्या अशा बाळांना आजीवन विमान प्रवास मोफत देण्याची सुविधा पुरवितात.