आश्चर्य ! 9 गोळ्या लागूनही मृत्यूच्या दाढेतून परतलेले सीआरपीएफ कमांडंट चेतन चिता कामावर रुजू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 08:49 AM2018-03-20T08:49:09+5:302018-03-20T08:49:09+5:30
दहशतवाद्यांशी लढताना अंगावर 9 गोळ्या झेलूनही मृत्यूच्या दाढेतून परतलेले सीआरपीएफ कमांडंट चेतन चिता हे पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.
नवी दिल्ली- दहशतवाद्यांशी लढताना अंगावर 9 गोळ्या झेलूनही मृत्यूच्या दाढेतून परतलेले सीआरपीएफ कमांडंट चेतन चिता हे पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. दहशतवाद्यांच्या 9 गोळ्या लागूनही कामावर पुन्हा रूजू होणं हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत त्यांना 9 गोळ्या लागल्या होत्या.
केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) चेतन चीता या कमांडिंग ऑफिसरना कीर्तिचक्र पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. काश्मीरच्याच हाजिन क्षेत्रात गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांशी लढताना चेतन चिता हे गंभीररीत्या जखमी झाले होते. या कारवाईत त्यांना 9 गोळ्या लागल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान ते आश्चर्यकारकरीत्या बचावले होते.
काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांशी लढताना चेतन चिता जखमी झाले होते. त्यांच्या शरीरात नऊ गोळ्या घुसल्या होत्या. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले त्यावेळी त्यांच्या डोक्यातही गोळी घुसल्याची माहिती मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले वाढत आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवादी आणि त्याला मदत करणाऱ्या तिघांना कंठस्नान घातले होते. रविवारी रात्री लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी लष्करानेही प्रत्युत्तरदाखल गोळीबार केला होता. यामध्ये एक दहशतवादी ठार झाला होता. तसेच घटनास्थळावरून तीन अन्य मृतदेहसुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. हे मृतदेह दहशतवाद्याला मदत करणाऱ्यांचे असल्याचे लष्कराने सांगितले आहे. मात्र स्थानिकांनी हे मृतदेह सर्वसामान्य नागरिकांचे असल्याचा दावा केला होता.