आश्चर्य! चक्क वडिलांच्या अंत्ययात्रेत मुलींनी केला डान्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 10:57 PM2017-11-13T22:57:56+5:302017-11-13T22:59:01+5:30
नवी दिल्लीतल्या नोएडात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी बँडबाजासह वाजतगाजत त्यांची मिरवणूक काढली आहे.
नवी दिल्ली : घरातल्या वडिलधा-या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर आप्तस्वकीयांना अश्रू अनावर होत नाहीत. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याची वेदना मुलांना असह्य करते, परंतु नवी दिल्लीतल्या नोएडात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी बँडबाजासह वाजतगाजत त्यांची मिरवणूक काढली आहे. या मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांना याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे.
विशेष म्हणजे वडिलांच्या अंत्ययात्रेतच मुलींनी बँडबाजावर डान्स केलाय. नवी दिल्लीतली प्रसिद्ध पानविक्रेता हरिभाई लालवानी यांना ब्रेन स्ट्रोक या आजारानं पछाडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांचे उपचारादरम्यान निधन झालं. त्यामुळे लालवानींच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. हरिभाई यांनी स्वतःची शेवटची इच्छा कुटुंबीयांजवळ बोलून दाखवली होती. ते म्हणाले होते, माझ्या मृत्यूनंतर कोणीही दुःख व्यक्त करू नये, मुलाच्या जन्मानंतर जसा आनंद व्यक्त करण्यात येतो, त्याप्रमाणेच माझी बँडबाजासह वाजतगाजत अंत्ययात्रा काढून माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत. वडिलांच्या शेवटच्या इच्छेखातर मुलींनी त्यांची अंत्ययात्रा वाजतगाजत काढली. लालवानी यांच्या चारही मुलींनीच त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला असून, एकीनं मुखाग्नी देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत.
गुटखा किंग म्हणून प्रसिद्ध असलेले हरिभाई लालवानी 1994मध्ये औद्योगिक संघटना नोएडा एंटरप्रेन्योझर्स असोसिएशनचे अध्यक्ष झाले. 90च्या दशकात एका छोट्या पान टपरीच्या माध्यमातून व्यवसायाची सुरुवात करणा-या हिरभाईंना अल्पावधीत लोक गुटखा किंग म्हणून ओळखू लागले.