आश्चर्य ! एकदा चार्ज केल्यावर 50 दिवस चालणारा फोन लाँच
By admin | Published: April 23, 2017 05:45 PM2017-04-23T17:45:30+5:302017-04-23T17:45:30+5:30
टेलिकॉम कंपनी झिवीने नुकताच एक नवीन जबरदस्त फीचर असलेला फोन लाँच केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - मोबाईलच्या बाजारात एका वेगळ्याच प्रकारची क्रांती अनुभवायला मिळते आहे. बाजारात नवं नवे फीचर असलेले अनेक स्मार्टफोन दाखल होत असतानाच जिओनीनंतर आता टेलिकॉम कंपनी झिवीने नुकताच एक नवीन जबरदस्त फीचर असलेला फोन लाँच केला आहे. सुमो टी -3000 असं या फोनचं नाव असून, तो एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 50 दिवस चालू शकतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
भारतात या फोनवर कमी बजेट असलेल्या अनेकांच्या उड्या पडत आहेत. झिवीच्या या फोनची किंमत फक्त 1490 रुपये आहे. या फोनमध्ये एक शक्तिशाली बॅटरी बसवण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन वारंवार चार्ज करावा लागणार नसल्याची माहिती झिवी मोबाईल फोन कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी पंकज आनंद यांनी दिली आहे. फोनची स्क्रीन हातातून खाली पडल्यामुळे अथवा इतर कोणत्याही कारणास्तव फुटल्यास स्क्रीन बदलता येऊ शकेल, असंही कंपनीनं सांगितलं आहे. या फोनचा सर्वाधिक वापर ग्रामीण भागात होण्याची शक्यता असून, विजेचा तुटवडा असलेल्या गावांमधल्या ग्राहकांसाठी हा फोन फायदेशीर ठरणार आहे.
या फोनमध्ये 2.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये फ्लॅशसोबत फीचर कॅमे-याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. फोनमध्ये ऑटो कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल ट्रॅकरचीही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कोणालाही फोन केल्यास तो रेकॉर्ड होणार आहे. मात्र तुम्ही ऑटो कॉल रेकॉर्डचं फीचर फोनमधल्या सेंटिग्जमधून बंदही करू शकता. तसेच मोबाईलला टच लाइट देण्यात आली असून, जीपीआरएस सिस्टिमही बसवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला जीपीआरएसच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करता येणार आहे. एकंदरीतच कमी बजेट असलेल्या आणि स्मार्टफोनची हौस नसलेल्या ग्राहकांसाठी हा फोन एक वरदान ठरणार आहे.