आश्चर्य ! या मंदिराचं छत कोणीच बांधू शकत नाही
By admin | Published: March 30, 2016 04:04 PM2016-03-30T16:04:28+5:302016-03-30T16:04:28+5:30
मंडी जिल्ह्यात असलेल्या शिकारी मातेच्या मंदिराचं छत हा एक कौतुकाचा विषय आहे. कारण आजपर्यंत कोणीच या मंदिराचं छत बांधू शकलेला नाही
Next
>ऑनलाइन लोकमत -
शिमला, दि. ३० - मंडी जिल्ह्यात असलेल्या शिकारी मातेच्या मंदिराचं छत हा एक कौतुकाचा विषय आहे. कारण आजपर्यंत कोणीच या मंदिराचं छत बांधू शकलेला नाही. पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधलेल्या या मंदिराचं छप्पर बांधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र कोणालाच यश मिळालं नाही. पांडवांनी जाणुनबुजून या मंदिराचं छत बांधल नव्हतं, खुल्या आकाशाखाली त्यांनी या मुर्तीची स्थापना केली होती त्यामुळेच देवीला खुल्या आकाशाखाली राहणं आवडतं असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
हिमाचल प्रदेशातील चौहार खो-यात एका उंच शिखरावर हे मंदिर वसलेलं आहे. समुद्रसपाटीपासून 2850मीटर उंचीवर हे मंदिर आहे. पांडवांनी अज्ञातवासादरम्यान तपश्चर्या केली होती त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन पांडवांना युद्धात कौरवांचा पराभव करुन विजयी होण्याचा आशिर्वाद दिला होता. त्यानंतर पांडवांनी जाताना मंदिराची स्थापना केली होती असं सांगितलं जात. मात्र त्यांनी मंदिराच छप्पर का बांधलं नाही ? याबाबत नेमकं कारण कोणाला माहित नाही. या छतामागचं नेमक रहस्य काय ? याचा उलगडा अजूनपर्यंत झालेला नाही.
हिवाळ्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते ज्यामुळे सर्व गाव बर्फाखाली येतं. मात्र इतकी बर्फवृष्टी होऊनदेखील मंदिरावर बर्फ अजिबात राहत नसल्याचं ग्रामस्थ सांगतात. या देवीला शिकारी माता का म्हणतात ? यामागेदेखील एक गोष्ट आहे. मंदिराच्या ठिकाणी अगोदर घन जंगल होतं. अनेक शिकारी याठिकाणी राहायचे. शिकारीला जाण्यापुर्वी देवीच्या मंदिरात येऊन प्रार्थना करायचे आणि त्यांना त्यात यशही मिळायचं. त्यानंतर या मंदिराला शिकारी मातेचं मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.