आश्चर्य! आज पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेच नाहीत...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 08:42 AM2018-09-19T08:42:53+5:302018-09-19T08:46:18+5:30
केंद्र सरकारने जीएसटी आणला असला तरीही इंधन त्यापासून बाहेर ठेवले आहे. यामुळे राज्यांकडून व्हॅटही लावला जात आहे. शिवाय अधिभारही असल्याने इंधनाचे दर आशियात आपल्याकडे सर्वाधिक आहेत.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढत चाललेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनी नव्वदी गाठली असताना आज हे दर वाढलेच नाहीत. याआधी 12 सप्टेंबरला दर वाढले नव्हते.
आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया दिवसेंदिवस घसरत चालल्याने तसेच अमेरिकेचे इराणशी संबंध बिघडल्यामुळे त्याचा परिणाम तेलाच्या किंमतींवर होत आहे. तसेच केंद्र सरकारने जीएसटी आणला असला तरीही इंधन त्यापासून बाहेर ठेवले आहे. यामुळे राज्यांकडून व्हॅटही लावला जात आहे. शिवाय अधिभारही असल्याने इंधनाचे दर आशियात आपल्याकडे सर्वाधिक आहेत.
इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना इंधन जीएसटीमध्ये आणण्याची मागणी केली जात आहे. केंद्र सरकारचे मंत्रीही याबाबतचे वक्तव्य करत आहेत. मात्र, जीएसटीमध्ये पेट्रोलियम उत्पादनांना आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे नाखुश आहेत.
केंद्र सरकारने किती कमवले पहा...
मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांनी अद्याप नव्वदी गाठलेली नसली तरीही राज्यात बऱ्याच ठिकाणी दरांनी नव्वदी पार केली आहे. नांदेडमधील काही भागात तर पेट्रोल 92 रुपयांवर पोहोचले आहे. आज दर न वाढल्यामुळे पेट्रोल 89.54 आणि डिझेल 78.42 रुपयांवर आहे.