पुन्हा मोदी.. आता लोकसभा निवडणुका झाल्यास एनडीएला मिळणार बहुमत, सर्वेक्षणातून बाब समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 08:30 AM2021-01-22T08:30:31+5:302021-01-22T08:36:32+5:30
५० टक्के लोकांची मोदींच्या कामालाही पसंती
कोरोना काळात करण्यात आलेल्या उपाययोजना आणि अन्य मुद्दे योग्यरित्या हाताळणाऱ्या पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची जादू आजही कायम आहे. जर आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यास पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएनला बहुमत मिळण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. इंडिया टु़डे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. ३ जानेवारी ते १३ जानेवारी २०२१ दरम्यान १२,२३२ जणांदरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं. यापैकी ६७ टक्के लोकं ग्रामीण तर ३३ टक्के लोकं शहरी भागातील होती.
आता निवडणुका पार पडल्यास लोकसभेच्या ५४३ जागांपैकी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४३ टक्के मतांसह ३२१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर केवळ भाजपाला ३७ टक्के मतांसह २९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युपीएला २७ टक्के मतांसह ९३ जागा मिळू शकतात. यापैकी काँग्रेसला १९ टक्के जागांसह केवळ ५१ जागांवर समाधान मानावं लागू शकतं. तर अन्य पक्षांना ३० टक्के मतांसह १२९ जागा मिळण्याची शक्यता आहे.
या सर्वेक्षणात लोकांना त्यांचे आवडते मुख्यमंत्री कोण असाही प्रश्न विचारण्यात आला होता. सर्वेक्षणादरम्यान सर्वाधिक म्हणजेच २५ टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आवडते मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आहेत. त्यांना १४ टक्के लोकांनी पसंती दिली. तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आहेत. त्यांना एकून ८ टक्के लोकांनी पसंती दिली.
आजवरचे आवडते पंतप्रधान कोण?
सर्वेक्षणानुसार आजवरच्या सर्वात आवडते पंतप्रधान बनण्याचा मानही नरेंद्र मोदी यांनाच मिळाला आहे. ३८ टक्के लोकांनी ते आजवरचे उत्तम पंतप्रधान असल्याचं म्हटलं.तर १८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला पसंती दिली. ११ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि ८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे आजवरचे आवडते पंतप्रधान असल्याचं म्हटलं.
५० टक्के लोकांची कामाला पसंती
कोरोना कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम सर्वोत्तम असल्याचं म्हटलं. तर ५० टक्के लोकांनी त्यांचं काम चांगलं असल्याचं सांगितलं. १८ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधानांचं काम सरासरी असल्याचं सांगण्यात आलं. तर ७ टक्के लोकांनी त्यांचं खराब आणि २ टक्के लोकांनी त्यांचं काम अतिशय खराब असल्याचं सर्वेक्षणादरम्यान सांगितलं.