‘मोबाइलला आधारच्या सक्तीमुळे सुरक्षेला धोका’ - सुब्रमण्यम स्वामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:57 AM2017-11-01T00:57:44+5:302017-11-01T00:58:08+5:30
मोबाइल फोनला आधारचा क्रमांक जोडण्याच्या सक्तीमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी म्हटले.
नवी दिल्ली : मोबाइल फोनला आधारचा क्रमांक जोडण्याच्या सक्तीमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी म्हटले. स्वामी म्हणाले, देशाच्या सुरक्षेबद्दल मला वाटत असलेली काळजी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळवली आहे.
‘आधार क्रमांकाच्या सक्तीमुळे देशाच्या सुरक्षेला कसा धोका निर्माण झाला आहे याचा तपशील मी मोदींना लवकरच लिहून कळवणार आहे. मला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय ही सक्ती रद्द करील, असे स्वामी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. मोबाइल फोनला आधार क्रमांक जोडण्याच्या सक्तीला आव्हान देणाºया याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला त्याचे म्हणणे मांडण्यास सांगितल्यानंतर दुसºया दिवशी स्वामी यांनी हे टष्ट्वीट केले. सरकारच्या वेगवेगळ्या सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेल्या याचिकांवर एकत्रित सुनावणी आमच्या घटनापीठासमोर सुरू होईल, असेही न्यायालयाने
म्हटले आहे. स्वामी यांनी यापूर्वीही आधार हा अनाहुत असल्याचे व विदेशी गुप्तचर यंत्रणांकडून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याबद्दल सांगितले होते. आधार व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सरकारने अमेरिकन कंपनीला दिले असल्यामुळे माहितीच्या सुरक्षेचा (डाटा सिक्युरिटी) प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा या डाटाचा त्यांच्या हितसंबंंधांसाठी गैरवापर करण्याची शक्यता आहे, असे स्वामी म्हणाले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय खंडपीठाने नुकतेच खासगीपणाचा हक्क हा मूलभूत असल्याचा निर्णय दिला होता. अनेक याचिकाकर्त्यांनी आमच्या खासगीपणाचे उल्लंघन होत असल्याचे सांगून आधारच्या वैधतेला आव्हान दिले आहे.