धक्कादायक ! 'ब्लू व्हेल गेम' चॅलेंजसाठी शाळेत आत्महत्या करत होता विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 08:17 AM2017-08-11T08:17:26+5:302017-08-11T08:50:38+5:30
मुंबई पाठोपाठ आता मध्य प्रदेशातील इंदुर शहरात एका विद्यार्थ्यानं ब्लू व्हेल गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भोपाळ, दि. 11 - 'ब्लू व्हेल' या जीवघेण्या गेमचं संकट अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. कारण मुंबई पाठोपाठ आता मध्य प्रदेशातील इंदुर शहरात एका विद्यार्थ्यानं ब्लू व्हेल गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'ब्लू व्हेल'चा अंतिम म्हणजेच 50वा टप्पा पार करण्यासाठी या विद्यार्थ्यानं शाळा इमारतीच्या तिस-या मजल्यावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं यावेळी शिक्षकानं या मुलाला पाहिलं व लगेचच त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. यामुळे त्या मुलाचा जीव वाचू शकला.
राजेंद्र नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चमेली देव शाळेमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणा-या विद्यार्थी 'ब्लू व्हेल चॅलेंज'मधील 50वा टप्पा पूर्ण करण्यासाठी शाळा इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन उडी मारत होता. त्यानं उडी मारल्यास 2 कोटी रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सतर्क शिक्षकाने या मुलाचा 'ब्लू व्हेल गेम'मुळे बळी जाण्यापासून बचावले आहे.
MP: Class 7th student attempted suicide in his school in Indore while allegedly following instructions given in an online game 'Blue Whale' pic.twitter.com/tjuOoZGaoh
— ANI (@ANI) August 11, 2017
अंधेरीतील मुलाचा ब्लू व्हेलमुळे बळी
मुंबईमधील अंधेरी येथे राहणा-या 14 वर्षीय मुलाने ब्लू व्हेल गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या केली होती. या मुलाला ब्लू व्हेल या ऑनलाइन गेमचे व्यसन जडले होते. रशिया आणि अन्य देशांमध्येही काही जणांना या गेमच्या नादात आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शेजारच्या इमारतीत राहणा-या लोकांनी या मुलाला इमारतीच्या गच्चीवर पाहिले होते. त्यावेळी तो स्वत:चा सेल्फी व्हिडीओ काढताना दिसत होता. अंधेरी पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे.
ब्लू व्हेल, हा गेम नक्की आहे काय?
या गेममध्ये एकदा प्रवेश केला की खेळणारा मरेर्पयत काही त्यातून बाहेर पडू शकत नाही. हा ब्लू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अॅडमिनिस्ट्रेटर. तो ऑर्डर देणारा व्यक्ती अज्ञात असतो, गेममधला अदृश्य कुणी. एकदा या खेळात लॉग इन केलं की तो वेगवेगळ्य़ा आज्ञा देतो. खेळायचं तर आज्ञा पालन करणं आलंच. साधारणतर् 50 प्रकारच्या आज्ञांचे टप्पे मुलांना ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेनं होते. शेवटी खेळणार्याला आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं. काही शूरवीर आपलं जीवन खेळण्याच्या नादात संपवतातही! या गेममध्ये होतं काय की सुरुवातीला रात्री-अपरात्री उठणं, हॉरर सिनेमे एकटय़ानं पाहणे वगैरे टप्पे दिले जातात. नंतर मात्र स्वतःला इजा करुन घेणं, ब्लेडने कापून घेणं असे किळसवाणे आणि धोकादायक प्रकार करवून घेतले जातात.
सरते शेवटी चक्क आत्महत्या करण्याची ऑर्डर दिली जाते, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही मुलांनी हे टप्पे पार करुन आत्महत्या केल्याही. युलिया, कोन्स्टान्टिनोव्हा आणि व्हेरोनिका वोल्वोवा या दोन तरुण मुलींनी इमारतीवरुन उड्या मारल्यानंतर रशियन पोलीस एकदम सतर्क झाले. आपल्या देशात तरुणांच्या जीवाशी एक गेम खरंच खेळ करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मग ब्लू व्हेलचा तपास सुरु झाला आहे. आतार्पयत शंभराहून अधिक आत्महत्या या खेळामुळे झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
पालकांनो हे कराच...-
मुले कोणता गेम खेळतात, याकडे लक्ष द्या.
त्यांच्याशी संवाद साधा, समजून घ्या.
मुला-मुलींना ओरडण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवा.
मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली कोणतीही गोष्ट करण्यापासून रोखा.
चांगले आणि वाईट काय, हे त्यांच्या वयाचे होऊन समजेल अशा भाषेत सांगा.
गेम टास्क-
हातावर ब्लेडने ब्ल्यू व्हेलचे चित्र रेखाटणे
हाताच्या नसा कापणे
ओठांवर ब्लेडने कापणे
पहाटे एखाद्या उंच ठिकाणी जाणे
पहाटे उठून हातावर वार करणे
हॉरर चित्रपट पाहणे
गच्चीवरून उडी मारणे
सोशल मीडियापासून
दूर ठेवण्यासाठी मैदानी खेळ, एकत्रित सहल,
गेट-टुगेदर अशा गोष्टी करा.