...म्हणून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास अद्याप अपूर्ण; सीबीआयनं सांगितलं कारण
By कुणाल गवाणकर | Published: December 30, 2020 05:45 PM2020-12-30T17:45:05+5:302020-12-30T17:45:26+5:30
Sushant Singh Rajput Death Case: सीबीआयनं पीएमओला पाठवलेला तपासाचा स्टेटस रिपोर्ट
नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही. सहा महिन्यांपूर्वी सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आढळून आला. सुरुवातीला मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर सीबीआयनं प्रकरणाचा तपास हाती घेतला. मात्र तब्बल १४५ दिवसांनंतरही सीबीआयच्या हाती ठोस असं काहीही हाती लागलेलं नाही. या प्रकरणाचे सर्व पैलू लक्षात घेऊन तपास सुरू असून कोणतीही शक्यता नाकारता येत नसल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे.
भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) पत्र लिहून सुशांत प्रकरणाच्या तपासाची माहिती मागितली होती. त्यानंतर सीबीआयनं पीएमओला पत्र लिहून तपासाबद्दलची माहिती दिली. 'केंद्रीय तपास यंत्रणा अतिशय सखोलपणे प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यासाठी आधुनिक वैज्ञानिक तंत्राचा वापर केला जात आहे. तपासादरम्यान मृत्यूच्या सर्व पैलूंचा विचार करण्यात येत आहे. कोणतीही शक्यता नाकारण्यात आलेली नाही,' अशी माहिती सीबीआयनं स्वामी यांना आज दिली.
CBI responds to BJP leader Subramanian Swamy on Sushant Singh Rajput case
— ANI (@ANI) December 30, 2020
"The CBI is conducting investigation in a thorough & professional manner using latest scientific techniques.All aspects are being looked at & no aspect has been ruled out as on date,"the letter by CBI reads
'तपासादरम्यान मोबाईल फॉरेन्सिक उपकरणांच्या मदतीनं डिजिटल उपकरणांमधील महत्त्वपूर्ण डेटा काढून त्याचं विश्लेषण करण्यात आलं. संबंधित मोबाईल टॉवरच्या माध्यमातून मिळालेल्या डेटाचंही विश्लेषण केलं गेलं,' अशी माहिती सीबीआयानं दिली. 'सुशांतच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या सगळ्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात अतिशय व्यापक आणि सखोल तपास करण्यात आला आहे,' असं सीबीआयनं स्वामी यांना पाठवलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे.
सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह १४ जूनला त्याच्या राहत्या घरात आढळून आला. सुशांतची हत्या झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. तशी तक्रारदेखील त्यांनी बिहारमध्ये दाखल केली. यानंतर मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयानं सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले. मात्र जवळपास ५ महिन्यांतरही सीबीआयच्या हाती ठोस असं काहीही लागलेलं नाही.