Sushant Singh Rajput Case: सुशांतची हत्या नव्हे, आत्महत्या; एम्सचा शवचिकित्सा अहवाल सीबीआयला सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 05:01 AM2020-10-04T05:01:00+5:302020-10-04T06:54:15+5:30
Sushant Singh Rajput Case: आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले का, यादृष्टीने सीबीआय तपास करणार
नवी दिल्ली : बॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली आहे, असा निष्कर्ष एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी काढला आहे. त्यामुळे त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले का, यादृष्टीने सीबीआय तपास करणार असल्याचे सांगण्यात आले.
सुशांतने आत्महत्याच केली अशा निष्कर्षाप्रत मुंबई पोलीस आले होते. पण मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगून सुशांतचे कुटुंबीय आणि बिहार पोलिसांनी तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी केली होती. सुशांतसिंह याचा शवचिकित्सा अहवाल व अन्य बाबींची फेरतपासणी डॉ. गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने केली. सुशांतसिंह याच्या व्हिसेराचा २० टक्के नमुना फेरतपासणीसाठी उपलब्ध असल्याने, त्याची तपासणी करून एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाने हा निष्कर्ष काढला आहे. सुशांतसिंह प्रकरणी फोरेन्सिक तज्ज्ञांनी एक लॅपटॉप, दोन हार्डडिस्क, कॅनन कॅमेरा व दोन मोबाइल फोनचीही बारकाईने तपासणी केली आहे.
एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाने सुशांतसिंह राजपूतचा शवचिकित्सा अहवाल व व्हिसेराच्या फेरतपासणीचा अहवाल सीबीआयला २९ सप्टेंबर रोजी सुपूर्द केला आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयात सुशांतसिंहची शवचिकित्सा करण्यात आली होती. त्यातील निष्कर्षांना एम्स डॉक्टरांच्या अहवालामुळे बळकटी मिळाल्याची चर्चा आहे. सुशांतसिंह याने आत्महत्या केल्याचे या प्रकरणी उपलब्ध असलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांतून स्पष्ट होते, असेही सूत्रांनी सांगितले.
सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून सध्या तपास सुरू आहे. त्याची हत्या झाली होती का? या दिशेने तपास सुरू झाला होता. पण एम्सच्या अहवालानंतर तपासाची दिशा आता बदलू शकते, असे सूत्रांनी सांगितले. सुशांतसिंहचा मृत्यू नेमका कशाने झाला याबद्दल आतापर्यंतच्या तपासात सीबीआय कोणत्याच निष्कर्षाला आली नव्हती.
वकिलाचा दावा केला होता अमान्य
सुशांतसिंह राजपूतचा गळा आवळून खून करण्यात आला, असा दावा त्याचे वकील विकास सिंह यांनी केला होता. तसे आपल्याला एम्सच्या एका डॉक्टरनेच सांगितल्याचेही विकास सिंह म्हणाले होते. मात्र हा दावा खोडताना त्या वेळी एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता म्हणाले, केवळ शरीरावरील काही खुणांवरून एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे की त्या व्यक्तीची हत्या झाली आहे हे सांगता येत नाही. त्यासाठी सखोल तपासणी करावी लागते.
सीबीआयचा तपास मुंबई पोलिसांपेक्षा वेगळा नसेल
या प्रकरणात सीबीआयचा तपास मुंबई पोलिसांपेक्षा वेगळा नसेल. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सर्व शक्यता गृहीत धरून व्यावसायिक पद्धतीने तपास केला होता, असा दावा मुंबईचे पोलील आयुक्त परमबीर सिंग यांनी केला.
मुंबईत एका कार्यक्रमात त्यांनी सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेला तपास व त्याबाबत झालेल्या आरोपाबाबत प्रथमच जाहीरपणे भूमिका जाहीर केली.
या प्रकरणात आपल्याकडे अद्याप कोणताही अधिकृत रिपोर्ट आलेला नाही. परंतु या प्रकरणाचा चौकशी अहवाल सीबीआयने तातडीने सादर करावा. त्या अहवालातून सुशांतने आत्महत्या केली की हत्या, हे नागरिकांना कळेल.
- अनिल देशमुख, गृहमंत्री