VIDEO: "रिया माझ्या मुलाला विष द्यायची; ती खुनी आहे, तिला तातडीनं अटक करा"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 10:36 AM2020-08-27T10:36:22+5:302020-08-27T10:36:56+5:30
सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा रियावर पहिल्यांदाच थेट आरोप
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा खून करण्यात आल्याचा दावा त्याचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे. सिंह यांनी प्रथमच अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तींवर अतिशय थेटपणे आरोप केले आहेत. रिया माझ्या मुलाची खुनी आहे. ती बऱ्याच कालावधीपासून माझ्या मुलाला विष देत होती. तिला आणि तिच्या साथीदारांना तातडीनं अटक करण्यात यावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप के. के. सिंह यांनी याआधी केला आहे. त्यांनी पाटण्यातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर नोंदवला. रिया आणि तिच्या कुटुंबीयांमुळेच सुशांतनं आत्महत्या केली. त्यांनीच सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असे आरोप सिंह यांनी केले होते. मात्र आता त्यांनी थेट रियानं सुशांतवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला आहे. रिया बऱ्याच दिवसांपासून माझ्या मुलाला विष देत होती. ती माझ्या मुलाची मारेकरी आहे, असा गंभीर आरोप सिंह यांनी केला आहे.
#WATCH Rhea Chakraborty was giving poison to my son, Sushant from a long time, she is his murderer. The investigating agency must arrest her and her associates: KK Singh, #SushantSinghRajput's father pic.twitter.com/EsVpAUlZMt
— ANI (@ANI) August 27, 2020
सुशांतच्या मृत्यूचा तपास सुरू असताना दररोज नवीन माहिती समोर येत आहे. सीबीआयनं तपास हाती घेतल्यापासून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. रिया अमली पदार्थ विकत घ्यायची अशी माहिती काही व्हॉट्सऍप चॅट्समधून समोर आली आहे. रियानं सुशांतला अमली पदार्थ दिले, असेही आरोप झाले आहेत. तशी माहिती व्हॉट्सऍप चॅटमधून समोर आली आहे. अमली पदार्थ दिले जात असल्याची कल्पना सुशांतला होती का, की त्याला नकळतपणे अमली पदार्थ दिले जात होते, याचा तपास आवश्यक असल्याचं सुशांतच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
सुशांतला त्रास देण्यात आल्याचा आरोप त्याची बहिण श्वेता सिंह किर्ती यांनी इन्स्टाग्रामवरून केला आहे. याआधी सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. मात्र आता त्यांच्याकडून रियावर हत्येचा आरोप केला जात आहे. सध्या या प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू आहे. सुशांतसोबत काम करणाऱ्या अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरज यांची अनेकदा चौकशी झाली आहे.