Sushant Singh Rajput Death Case: धमक्या मिळत असल्याचा सुशांतच्या कुटुंबीयांचा आरोप
By राजा माने | Published: August 13, 2020 05:25 AM2020-08-13T05:25:32+5:302020-08-13T05:26:40+5:30
मुंबई पोलिसांच्या तपासावरही घेतली शंका
पाटणा : आम्हाला काही जणांकडून धमक्या मिळत आहेत तसेच आमची प्रतिमा मलिन करण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आत्महत्या केलेला अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबीयांनी नऊ पानी निवेदनात केला आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलिसांनी सखोल तपास न करता काही प्रतिष्ठित लोकांना या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही यात केला आहे.
सुशांत व त्याच्या कुटुंबीयांमध्ये सलोख्याचे संबंध नव्हते असा सूर शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या संपादकीयात लावला होता. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी निवेदनात म्हटले आहे की, सुशांतच्या चार बहिणींपैकी सर्वात थोरली विदेशात स्थायिक आहे. त्याची दुसरी बहिण भारताच्या महिला क्रिकेट संघातून खेळत होती. तिसऱ्या बहिणीने कायदा शाखेचे शिक्षण घेतले आहे. सुशांतच्या चौथ्या बहिणीने फॅशन डिझाइनिंगचा कोर्स केला होता. या चार बहिणींनंतरचे पाचवे अपत्य म्हणजे सुशांतसिंह. सुशांतच्या कुटुंबीयांनी कधीही कोणाकडून काही घेतले नाही. सुशांतच्या आईचे अकाली निधन झाले, सुशांतचा हिंदी चित्रपटसृष्टीत जम बसला. गेल्या आठ-दहा वर्षांत घडलेल्या घटनांचे लोक आपल्याला हवा तसा अर्थ काढू लागले आहेत.
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे इतर कथित नातेवाईक प्रसारमाध्यमांना उलटसुलट माहिती देत आहेत. त्याच्याशी जवळकीच्या कहाण्या रचून सांगत आहेत. सुशांतचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. त्याच्या आजूबाजूला जमलेल्या लोकांनीच त्याला जाळ््यात अडकवले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना यातना होईल, अशाच गोष्टी घडविण्यात आल्या. त्याला मनोरुग्ण ठरविले. त्याच्या मृतदेहाची छायाचित्रे सर्वच माध्यमांवर झळकविण्यात आली, असे या निवेदनात म्हटले आहे.
प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात त्याच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यावेळी या पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप या अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात केला आहे. त्यात म्हटले आहे की, सुशांतसिंहचे वडील व चार बहिणी यांना धमक्या देण्यात येत आहेत. तसेच सुशांतसिंहची प्रतिमा मलिन करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.