सुशांतसिंह राजपूतच्या पाटणा येथील घराचे करणार स्मारक; कुटुंबियांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 11:32 PM2020-06-27T23:32:28+5:302020-06-27T23:32:48+5:30

जारी केले भावुक निवेदन । फाऊंडेशन स्थापन करण्याचा निर्णय

Sushant Singh Rajput's house in Patna to be commemorated; Family announcement | सुशांतसिंह राजपूतच्या पाटणा येथील घराचे करणार स्मारक; कुटुंबियांची घोषणा

सुशांतसिंह राजपूतच्या पाटणा येथील घराचे करणार स्मारक; कुटुंबियांची घोषणा

Next

पाटणा : सुशांत अमर्याद स्वप्ने पाहायचा आणि ती स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी त्याचा सिंहासारखा पाठपुरावा करायचा, अशा शब्दात दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबियांनी आपल्या भावनांना शनिवारी वाट मोकळी करून दिली.

बॉलिवूडमधील उगवता अभिनेता म्हणून लोकप्रिय होत असतानाच सुशांतसिंह राजपूत याने अलीकडेच आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी सुशांतच्या कुटुंबियांनी एक भावुक निवेदन जारी केले. त्यात या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, सुशांतच्या स्मरणार्थ ‘सुशांतसिंह राजपूत फाऊंडेशन’ची (एसएसआरएफ) स्थापना करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून चित्रपट, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रांतील तरुण प्रतिभावंतांना मदत केली जाईल. पाटणा शहरातील राजीवनगर येथील त्याचे बालपणीचे घर त्याच्या स्मारकात रूपांतरित करण्यात येईल. तेथे त्याच्या वैयक्तिक वस्तू जतन करून ठेवल्या जातील. त्यात हजारो पुस्तके, त्याची आवडती दुर्बीण, फ्लाईट सिम्युलेटर इत्यादींचा समावेश आहे. त्याची सोशल मीडियातील खाती वारसा खाती म्हणून कायम ठेवली जातील.

कुटुंबियांनी म्हटले की, ‘सुशांत हा मुक्तावेशी, बोलघेवडा आणि प्रचंड बुद्धिमान होता. प्रत्येक गोष्टीबाबत तो जिज्ञासू होता. त्याच्या स्वप्नांना मर्यादाच नव्हत्या; पण तो नुसतीच स्वप्ने पाहायचा नाही. स्वप्नांचा पाठपुरावाही तो सिंहासारखा करायचा. त्याचे हास्य उदार होते! तो आमचा अभिमान होता आणि कुटुंबाची प्रेरणाही होता.’ अवघा ३४ वर्षांचा सुशांत ‘काई पो छे’, ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘छिछोरे’ या सिनेमांमुळे चर्चेत आला होता. १४ जून रोजी त्याच्या बांद्रा येथील अपार्टमेंटमध्ये तो मृतावस्थेत सापडला होता.

चाहत्यांचे मानले आभार
कुटुंबियांनी म्हटले की, आमच्यासाठी स्वीकारणे कठीण झाले आहे की, त्याचे सहज हास्य आता आपण ऐकू शकणार नाही. त्याचे तेजस्वी डोळे पाहू शकत नाही, विज्ञानाबाबतची त्याची न संपणारी बडबड पुन्हा ऐकू येणार नाही. सुशांतच्या जाण्याने आमच्या जीवनात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सुशांतबाबत प्रेम दाखविणाऱ्या त्याच्या चाहत्यांचे कुटुंबियांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत.

Web Title: Sushant Singh Rajput's house in Patna to be commemorated; Family announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.