काहींच्या कुरापतींमुळे झालो राज्यपाल, मुख्यमंत्रीपद गेल्याची सल कायम- सुशीलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 09:33 PM2017-11-26T21:33:28+5:302017-11-26T21:33:38+5:30
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन वर्षांतच मला राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली. वरकरणी ही सहज बाब वाटत असली तरी काही लोकांनी कुरापती करून मला राज्यपालपदी बसविले
नागपूर : मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन वर्षांतच मला राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली. वरकरणी ही सहज बाब वाटत असली तरी काही लोकांनी कुरापती करून मला राज्यपालपदी बसविले, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री या प्रवासादरम्यान त्यांना अनेकदा संघर्षांनादेखील सामोरे जावे लागले. या वक्तव्यावरुन २००४ साली त्यांच्या मनाला झालेली जखम अद्यापही भरून निघाली नसल्याचे दिसून येत आहे.
रविवारी नागपुरात सुशीलकुमार शिंदे यांनी अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात वरील वक्तव्य केले. सुशीलकुमार शिंदे यांनी १८ जानेवारी २००३ ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र पावणेदोन वर्षातच त्यांच्याकडे आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून जबाबदारी देण्यात आली व ४ नोव्हेंबर २००४ ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे राजकीय वर्तुळातदेखील चर्चांना उधाण आले होते. मात्र शिंदे यांनी यावर मौनच बाळगले होते.
रविवारी मात्र सार्वजनिक मंचावरून त्यांनी काही व्यक्तींच्या कुरापतीमुळे आपले मुख्यमंत्रिपद गेले, असा दावा केला. शिंदे यांनी हे वक्तव्य करून त्यांच्या मनातील सल व्यक्त केली. शिंदे यांच्या कुरापती करणारे राजकीय क्षेत्रातील ते लोक कोण व शिंदे यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.