सुषमा यांनी उत्तरे द्यावीत, आम्ही संसद चालू देऊ
By admin | Published: August 11, 2015 02:51 AM2015-08-11T02:51:49+5:302015-08-11T02:51:49+5:30
सुषमा स्वराज यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांमध्ये आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदींनी किती पैसे जमा केले, याची माहिती संसदेला द्यावी, आम्ही लगेच आमचे आंदोलन मागे घेऊन संसद
नवी दिल्ली : सुषमा स्वराज यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांमध्ये आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदींनी किती पैसे जमा केले, याची माहिती संसदेला द्यावी, आम्ही लगेच आमचे आंदोलन मागे घेऊन संसद चालू देऊ, असा आक्रमक पवित्रा घेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा स्वराज यांना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मध्य प्रदेश व राजस्थानच्या भाजप मुख्यमंत्र्यांची प्रशंसा सुरू आहे. मात्र स्वराज यांच्याबाबतीत मात्र त्यांनी ‘सोयिस्कर मौन’ बाळगले आहे, याकडेही राहुल यांनी लक्ष वेधले.
विरोधक लोकसभेत
काँग्रेसच्या २५ खासदारांच्या निलंबनाविरोधात चार दिवसांपासून सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणारे विरोधक सोमवारी लोकसभेत परतले. अर्थात लोकसभेत परतल्यानंतरही ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्याच्या मुद्यावर काँग्रेससह विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. राज्यसभेत विविध मुद्यांवरील गोंधळामुळे सोमवारीही कुठलेच कामकाज होऊ शकले नाही. याचदरम्यान सत्ताधारी व विरोधकांनी परस्परांवर कोंडी फुटावी यासाठी प्रयत्न होत नसल्याचा आरोप केला.
मुलायमसिंहांचा पुढाकार
समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव सोमवारी लोकसभेत काँग्रेसची साथ सोडत अनपेक्षितरीत्या संसद सुरळीत चालावी, यासाठी पुढाकार घेताना दिसले. कामकाज हाणून पाडण्याच्या भूमिकेस पक्षाचा पाठिंबा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय संसद सुरळीत चालावी, यासाठी विरोधकांशी बोलून मार्ग काढण्याची विनंतीही त्यांनी लोकसभाध्यक्षांना केली. त्यांच्या या विनंतीवरून लोकसभाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज ३० मिनिटे स्थगित करून विविध पक्षांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. मात्र या चर्चेत मुलायमसिंह व काँग्रेस नेत्यांनी या चर्चेकडे पाठ फिरवली. दरम्यान, संसदेचे कामकाज हाणून पाडण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच जबाबदार आहेत, या आरोपाचा पुनरुच्चार सरकारने सोमवारी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)