एका ट्विटवर समस्या सोडवणाऱ्या, मदतीसाठी तत्पर असणाऱ्या सुषमा स्वराज यांची जयंती; नेटकऱ्यांकडून आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 09:40 AM2021-02-14T09:40:06+5:302021-02-14T09:44:20+5:30

Sushma Swaraj Birth Anniversary: परराष्ट्र मंत्रालय लोकाभिमुख करणाऱ्या, ट्विटद्वारे साद घालणाऱ्या प्रत्येकास मदत करणाऱ्या सुषमा स्वराज यांची आज जयंती आहे.

Sushma Swaraj Birth Anniversary facts about Iron Lady of India | एका ट्विटवर समस्या सोडवणाऱ्या, मदतीसाठी तत्पर असणाऱ्या सुषमा स्वराज यांची जयंती; नेटकऱ्यांकडून आदरांजली

एका ट्विटवर समस्या सोडवणाऱ्या, मदतीसाठी तत्पर असणाऱ्या सुषमा स्वराज यांची जयंती; नेटकऱ्यांकडून आदरांजली

Next

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं लोकाभिमुख करणाऱ्या नेत्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांची आज जयंती आहे. परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार असताना स्वराज अवघ्या एका ट्विटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भारतीयांना मोलाची मदत केली. तुम्ही जगात कुठेही असा, तुमचा देश तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे, अशी भावना स्वराज यांनी परदेशात असलेल्या भारतीयांच्या मनात निर्माण केली. याशिवाय देशातील नागरिकांनादेखील त्यांनी वेळोवेळी मोलाची मदत केली. स्वराज यांच्या असंख्य आठवणींना आज अनेकांनी उजाळा दिला आहे.

सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरीनं एका केकचा फोटो शेअर करून आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'आई, आता केक फिका वाटतो. स्नेह आणि करुणा यांचं मानवीय रुप म्हणजे सुषमा स्वराज. आज आपण कोणाला तरी मदत करू आणि आईचा वाढदिवस साजरा करू,' असं बासुरीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. बासुरीच्या ट्विटर कमेंट करून अनेकांनी सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.



सर्वात कमी वयात कॅबिनेट मंत्री
झुंजार आणि तडफदार नेत्या म्हणून सुषमा स्वराज कायम स्मरणात राहतील. 1977 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी सुषमा स्वराज हरियाणाच्या कामगार मंत्री झाल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची नोंद झाली. १९७७ ते १९७९ दरम्यान समाजकल्याण, कामगार यासारख्या आठ खात्यांची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली. त्यानंतर वयाच्या २७ व्या वर्षी त्या जनता पार्टीच्या हरियाणा प्रदेशाध्यक्ष झाल्या.



पहिल्या महिला मुख्यमंत्री, पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या
राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही सुषमा स्वराज स्मरणात राहतील. त्याशिवाय, पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही स्वराज यांच्या नावाची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात आहे. देशाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर हे जबाबदारीचं पद भूषवणाऱ्या सुषमा स्वराज दुसऱ्या महिला नेत्या होत्या.



तीनदा आमदार, सातवेळा खासदार
चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्या एकूण ११ निवडणुका जिंकल्या. त्या तीन वेळा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या, तर सात वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या. २००० मध्ये सुषमा स्वराज या राज्यसभेवर निवडून गेल्या आणि अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये त्या पुन्हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मंत्री बनल्या. त्याचदरम्यान राष्ट्रीय राजकारणात आणि भाजपामध्ये त्यांचा प्रभाव प्रचंड वाढला.

सुषमा स्वराज जगाच्या पाठीवर कोणत्याही भारतीयाला एका ट्विटद्वारे पोहोचवायच्या मदत, 10 महत्त्वाची उदाहरणं

भाजपच्या दुसऱ्या पिढीतील वजनदार नेत्या
2009मध्ये त्यांना भाजपाकडून पंतप्रधानपदाच्या प्रबळ दावेदार मानलं जाऊ लागलं. परंतु निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं आणि सुषमा स्वराज यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं. नेतृत्व क्षमतेच्या जोरावर सुषमा स्वराज यांच्याकडे भाजपाच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात वजनदार नेत्या म्हणून पाहिलं जात होतं. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विदिशातून विजय मिळवला होता. सुषमा स्वराज यांची पत आणि भाजपासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता मोदींनी त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं सोपवलं.

वक्तृत्व.. नेतृत्व.. कर्तृत्वाचा मिलाफ म्हणजे सुषमा स्वराज!

परराष्ट्र मंत्री म्हणून शानदार कामगिरी
मोदी सरकार-१ दरम्यान परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी केलेल्या कामाला तर तोड नव्हती. ट्विटरवरून साद घालणाऱ्या प्रत्येकाला सुषमांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते कुलभूषण जाधव आणि गीताच्या सुटकेसाठी मनापासून प्रयत्न केले होते. त्यासाठी देश त्यांचा कायमच कृतज्ञ राहील. सुषमा स्वराज यांनी 2018मध्ये तब्येतीच्या कारणास्तव २०१९ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतरही त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचं खात कायम होतं.

Web Title: Sushma Swaraj Birth Anniversary facts about Iron Lady of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.