Sushma Swaraj Death : वर्षभरात दिल्लीने गमावले तीन माजी मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 03:31 PM2019-08-07T15:31:14+5:302019-08-07T15:49:43+5:30

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दिल्लीने वर्षभरात तीन मुख्यमंत्री गमावले आहेत.

Sushma Swaraj Death delhi lost its three former cms included sushma swaraj within less than a year | Sushma Swaraj Death : वर्षभरात दिल्लीने गमावले तीन माजी मुख्यमंत्री

Sushma Swaraj Death : वर्षभरात दिल्लीने गमावले तीन माजी मुख्यमंत्री

Next
ठळक मुद्देसुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दिल्लीने वर्षभरात तीन मुख्यमंत्री गमावले आहेत. शीला दीक्षित आणि मदन लाल खुराणा या दोन माजी मुख्यमंत्र्यांचे याआधी निधन झाले आहे. सुषमा स्वराज यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर 1998 या कालावधीत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती.

नवी दिल्ली - भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं आहे. भाजपाच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दिल्लीने वर्षभरात तीन मुख्यमंत्री गमावले आहेत. शीला दीक्षित आणि मदन लाल खुराणा या दोन माजी मुख्यमंत्र्यांचे याआधी निधन झाले आहे. 

सुषमा स्वराज यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर 1998 या कालावधीत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. त्यांना दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं देखील जुलै महिन्यात निधन झालं. सर्वाधिक काळ दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान दीक्षित यांच्याकडे जातो. 1998 ते 2013 या कालावधीत त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. गांधी कुटुंबियांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्या अशी त्यांची ओळख होती. दीक्षित यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दिल्लीत अनेक विकासकामं झाली. त्यांच्याच कार्यकाळात दिल्लीत मेट्रो धावली.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते मदन लाल खुराना यांचेही याआधी निधन झाले आहे. मदनलाल खुराना हे भाजपामधील मोठे नेते होते. दिल्लीच्या राजकारणात ते बऱ्याच काळापासून सक्रीय होते. 1993 ते 1996 या काळात ते दिल्लीचे मुख्यमंत्रीही राहिले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात खुराना संसदीय कार्यमंत्री आणि पर्यटन मंत्रीही राहिले होते. दिल्लीमधून ते चारवेळा संसदेवर निवडून गेले होते. अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द लाभलेल्या खुराना यांना 2001 मध्ये राजस्थानच्या राज्यपालपदी नेमण्यात आले. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी 2004 मध्ये राजीनामा देत पुन्हा सक्रीय राजकारणात परतावे लागले होते. ते भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही होते.

1977 ते 1979 दरम्यान समाजकल्याण, कामगार यासारख्या आठ खात्यांची जबाबदारी सुषमा स्वराज यांनी सक्षमपणे सांभाळली होती. त्यानंतर वयाच्या 27व्या वर्षी त्या जनता पार्टीच्या हरियाणा प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या. राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही सुषमा स्वराज यांची आठवण येईल. त्याशिवाय, पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही स्वराज यांच्या नावाची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात आहे.

सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. अर्थात, राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी, धडाकेबाज पराक्रम आणि अनेक विक्रम त्यांची कायमच आठवण करून देणारे आहेत. सुषमा स्वराज मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी त्यानंतर जाहीर केला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिन्यांपासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या.

काश्मीरबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर सुषमा स्वराज यांनी मंगळवारीच ट्विट केले होते की, पंतप्रधानजी, आपले हार्दिक अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करीत होते. विशेष म्हणजे, या ट्विटनंतर काही तासांतच म्हणजेच रात्री साडेनऊ वाजता हृदयविकारामुळे सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना लगेच अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्ष वर्धन आणि भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी एम्समध्ये धाव घेतली. रात्री उशिरा एम्सने सुषमा स्वराज यांचं निधन झाल्याची माहिती दिली.

सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरयाणाच्या अंबालामध्ये (तेव्हाचे पंजाब) झाला. अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी मिळविली होती. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली. 1973 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरूकेली. 1975 मध्ये त्यांचा विवाह स्वराज कौशल यांच्याशी झाला. बांसुरी ही त्यांची मुलगी. लंडनमध्ये ती वकिली करते.

नेतृत्व क्षमतेच्या जोरावर सुषमा स्वराज यांच्याकडे भाजपाच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात वजनदार नेत्या म्हणून पाहिलं जात होतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विदिशातून विजय मिळवला होता. सुषमा स्वराज यांची पत आणि भाजपासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता मोदींनी त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं सोपवलं. मोदी सरकार-1 दरम्यान परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी केलेल्या कामाला तर तोड नव्हती. ट्विटरवरून साद घालणाऱ्या प्रत्येकाला सुषमांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते कुलभूषण जाधव आणि गीताच्या सुटकेसाठी मनापासून प्रयत्न केले होते. त्यासाठी देश त्यांचा कायमच कृतज्ञ राहील.