Sushma Swaraj Death: भाजपाची मुलुखमैदानी तोफ शांत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 03:51 AM2019-08-07T03:51:07+5:302019-08-07T03:51:20+5:30
सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका अभ्यासू आक्रमक पर्वाचा अंत झाला आहे.
सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका अभ्यासू आक्रमक पर्वाचा अंत झाला आहे. हरियाणात वयाच्या २५ व्या वर्षी कॅबिनेटमंत्रीपद, २७ व्या वर्षी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रात परराष्ट्र खात्यासह महत्वाच्या पदाचे यशस्वी काम पाहणाऱ्या सुषमा स्वराज यांनी राजकारणात खूप कमी वयात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. सुषमा स्वराज नेहमीच म्हणायच्या की, राजकारण हे करियर म्हणून नव्हे, तर मिशन म्हणून आपण स्वीकारले आहे. घर आणि राजकारण यात कुणालाही प्राधान्य देण्याऐवजी मी यात संतुलन साधले आहे.
हरियाणा हे राज्य स्त्रियांच्या बाबतीत जुनाट रुढीवादी. इथल्या स्त्रिया सार्वजनिक जीवनात अभावानेच दिसतात. अशा परिस्थितीतही सुषमा स्वराज यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जी झेप घेतली ती निश्चितच कौतुकास्पद होती. चंदीगडमधील पंजाब विद्यापीठात शिकताना सुषमा स्वराज यांचा ओढा मार्क्सवादी साहित्याकडे होता. समाजवादी विचारांच्या स्वराज कौशल यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती मिझोरामचे राज्यपालही होते. बांसुरी ही त्यांची एकुलती एक मुलगी. सुषमा आणि स्वराज कौशल हे दोघेही व्यवसायाने वकील.
घरची जबाबदारी सांभाळून पक्षकार्यकर्त्या, पक्षाच्या सरचिटणीस, प्रवक्त्या, प्रचारक, केंद्रीय मंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्री, केंद्रात कॅबिनेट मंत्री अशा अनेक जबाबदाºया त्यांनी पार पाडल्या. आपल्या आक्रमक भाषणांमुळे सुषमा स्वराज संसदेच्या सभागृहात नेहमीच चर्चेत रहायच्या. निवडणूक प्रचार असला की, भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून सुषमा स्वराज यांच्या सभेसाठी उमेदवारांचा आग्रह असायचा. आपल्या अभ्यासू आणि आक्रमक भाषणातून त्या विरोधकांवर तूटून पडत असत. भाजपची ही मुलुखमैदानी तोफ आज शांत झाली आहे. त्यांना विनम्र अभिवादन.
>गाजलेले भाषण
सुषमा स्वराज यांनी २९ सप्टेंबर २०१८ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या ७३व्या आमसभेत बोलताना आमचा शेजारी देश दहशतवादाचा तज्ज्ञ असल्याचे म्हटले होते. त्या म्हणाल्या की, आमच्या देशात दहशतवाद दूरवर्ती आणि दुर्गम भागात निर्माण होत नाही. आमच्या पश्चिम सीमेच्या पलीकडे तो तयार होतो. आमचा शेजारी देश फक्त दहशतवादाचा आधार वाढविण्याच्या बाबतीतच तज्ज्ञ आहे, असे नव्हे तर दुतोंडी भूमिका घेऊन द्वेषभाव लपविण्यातही तो प्रचंड वाक्बगार आहे.