Sushma Swaraj Death: मृत्यूच्या आधी बोलल्या होत्या सुषमा, उद्या एक रुपया घेऊन जा !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 06:16 AM2019-08-07T06:16:18+5:302019-08-07T06:16:45+5:30
दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
नवी दिल्लीः माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या काही तासांपूर्वीच सुषमा स्वराज यांचं आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांची केस जिंकणारे वरिष्ठ वकील हरिश साळवेंशी बातचीत झाली होती. त्यांच्या शेवटच्या बोलण्याचा तो क्षण आठवून हरिश साळवे भावुक झाले आहेत. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांनी मला बुधवारी भेटण्यासाठी बोलावलं होतं आणि सांगितलं होतं की, तुमची 1 रुपयाची फी येऊन घेऊन जा.
हरिश साळवेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. मंगळवारी रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी सुषमा स्वराज यांच्याशी बोलणं झालं होतं. सोमवारी संध्याकाळी 8.50 वाजताही माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. आता ही बातमी ऐकून मन सुन्न झालं आहे. मला त्यांनी आज संध्याकाळी 6 वाजता एक रुपयाची फी घेण्यासाठी बोलावलं होतं. हरिश साळवे हे सांगत असताना प्रचंड भावुक झाले होते.
ते म्हणाले, मला आता काहीही समजत नाही मी काय करू, त्या वजनदार आणि ताकदवान मंत्री होत्या. माझ्यासाठी त्यांचं निधन म्हणजे मोठ्या बहिणीला गमावण्यासारखंच आहे. कुलभूषण प्रकरणात हरिश साळवेंनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आणि भारतीयांच्या अपेक्षेनुरुप कुलभूषण जाधव यांची मृत्युदंडाची शिक्षा तूर्त टळली.