Sushma Swaraj Death: आई... अशी कशी निघून गेलीस!, सोशल मीडियावर भावनात्मक ट्विट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 05:49 AM2019-08-07T05:49:17+5:302019-08-07T05:49:33+5:30
सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे.
नवी दिल्लीः देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावरूनही अनेक नेटकऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये त्या आर्टिकल 370वरून विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल करताना पाहायला मिळतायत.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवलं गेलं पाहिजे हे त्या बेधडक सांगत असल्याचं दिसत आहे. हिंसा करणाऱ्या पक्षांनीच धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरला आहे. आम्हाला हिंदू असल्याचा गर्व आहे. त्यामुळेच आम्ही सांप्रदायिक आहोत. जोपर्यंत आपल्याला हिंदू असल्याचा अभिमान असेल, तोपर्यंत आपण या तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांसारखे होणार नाही.
देशातली अनेक पक्ष हिंदूंना शिवीगाळ करण्यातच धन्यता मानतात. हीच त्यांची धर्मनिरपेक्षता आहे. खरं तर सुषमा स्वराज यांनीही 370 कलम हटवल्यानंतर अंतिम ट्विट केलं आहे. स्वराज यांनी कलम 370 रद्द केल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. 'प्रधानमंत्रीजी, तुमचं हार्दिक अभिनंदन. मी आयुष्यभर याच दिवसाची वाट पाहात होते,' अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी काश्मीरमधून 370 कलम काढून टाकल्याबद्दल मोदींवर स्तुतिसुमनं उधळली होती. कलम 370 काढून टाकणारं विधेयक राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही मंजूर झाल्यानंतर स्वराज यांनी त्यांच्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या होत्या.
आदित्य राठोड नावाच्या व्यक्तीनं हा व्हिडीओ ट्विटर शेअर केला असून, त्यात आई अशी कशी निघून गेलीस, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
माँ, ऐसे कैसे चली गई?#SushmaSwaraj ji 😥 pic.twitter.com/CGtjGCKgH2
— Aditya Rathore (@AdityaRathore_) August 6, 2019