Sushma Swaraj Death : सुषमा स्वराज मला आईसारख्या होत्या - हमीद निहाल अन्सारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 11:00 AM2019-08-07T11:00:47+5:302019-08-07T11:10:25+5:30

प्रेमाच्या शोधात पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील तुरुंगात अडकून पडलेला हमीद निहाल अन्सारी यांने सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. 

Sushma Swaraj Death: Sushma Swaraj was like a mother to me - Hamid Nihal Ansari | Sushma Swaraj Death : सुषमा स्वराज मला आईसारख्या होत्या - हमीद निहाल अन्सारी

Sushma Swaraj Death : सुषमा स्वराज मला आईसारख्या होत्या - हमीद निहाल अन्सारी

Next
ठळक मुद्देप्रेमाच्या शोधात पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील तुरुंगात अडकून पडलेला हमीद निहाल अन्सारी यांने सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. 'सुषमा स्वराज मला आईसारख्या होत्या. माझ्या हृदयात त्या कायम राहतील. त्यांच्याबद्दल खूप आदर आहे.' हमीदला भारतात परत आणण्यामध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोलाचा वाटा उचलला होता.

नवी दिल्ली - भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं आहे. सुषमा स्वराज यांना रात्री 9 च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपाच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. प्रेमाच्या शोधात पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील तुरुंगात अडकून पडलेला हमीद निहाल अन्सारी यांने सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. 

'सुषमा स्वराज मला आईसारख्या होत्या. माझ्या हृदयात त्या कायम राहतील. त्यांच्याबद्दल खूप आदर आहे.' असं हमीद निहाल अन्सारी याने म्हटलं आहे. हमीदला भारतात परत आणण्यामध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोलाचा वाटा उचलला होता. हमीद अन्सारीने सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्याच्या भावनांचा बांध फुटला होता. सुषणा स्वराज यांना जवळ घेत हमीदने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली होती. तसेच हमीदच्या आईनेही सुषमा स्वराज यांचे आभार मानले होते. मेरा भारत महान असे त्या म्हणाल्या होत्या.

हमीद निहाल अन्सारीला भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, यासाठी हमीदच्या कुटुंबीयांनी याआधीही सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. त्यावेळी सुषमा स्वराज यांची भेट घेतल्याने जो आत्मविश्वास निर्माण झाला. त्यावरून आपला मुलगा देशात परत येईल, असे वाटू लागले. असे हमीदच्या आईने सांगितले होते. पाकिस्तानमध्ये अडकून पडलेल्या हमीदबाबत सुषमा स्वराज यांना कळल्यानंतर त्यांनी हा प्रश्न पाकिस्तानसमोर उपस्थित केला होता. तसेच हमीद हा अवैधरीत्या पाकिस्तानमध्ये दाखल झाला असला तरी तो गुप्तहेर नसल्याचे दोन्ही देशातील अनेक व्यक्तींनी न्यायालयात सिद्ध केले. त्यानंतर हमीदच्या मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता.  

काश्मीरबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर सुषमा स्वराज यांनी मंगळवारीच ट्विट केले होते की, पंतप्रधानजी, आपले हार्दिक अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करीत होते. विशेष म्हणजे, या ट्विटनंतर काही तासांतच म्हणजेच रात्री साडेनऊ वाजता हृदयविकारामुळे सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना लगेच अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्ष वर्धन आणि भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी एम्समध्ये धाव घेतली. रात्री उशिरा एम्सने सुषमा स्वराज यांचं निधन झाल्याची माहिती दिली.

सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरयाणाच्या अंबालामध्ये (तेव्हाचे पंजाब) झाला. अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी मिळविली होती. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली. 1973 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरूकेली. 1975 मध्ये त्यांचा विवाह स्वराज कौशल यांच्याशी झाला. बांसुरी ही त्यांची मुलगी. लंडनमध्ये ती वकिली करते.

सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीत 1999मध्ये मोठी उलथापालथ झाली. त्यांना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात कर्नाटकातल्या बेल्लारीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. भाजपानं जाणूनबुजून सोनिया गांधींविरोधात त्यांना उभं केलं होतं. त्याच्यामागेही एक कारण होतं. भाजपानं परदेशी सून आणि भारताची मुलगी अशी प्रचाराची रणनिती आखली होती. पण निवडणुकीत सुषमा स्वराज यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपाची ती रणनिती बेल्लारीच्या लोकांवर फार प्रभाव पाडू शकली नाही.  

नेतृत्व क्षमतेच्या जोरावर सुषमा स्वराज यांच्याकडे भाजपाच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात वजनदार नेत्या म्हणून पाहिलं जात होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विदिशातून विजय मिळवला होता. त्यांची पत आणि भाजपासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता मोदींनी त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं सोपवलं. इंदिरा गांधींनंतर सुषमा स्वराज या दुसऱ्या महिला परराष्ट्र मंत्री झाल्या. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयातही आपला वेगळा ठसा उमटवला.  

 

Web Title: Sushma Swaraj Death: Sushma Swaraj was like a mother to me - Hamid Nihal Ansari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.