सुषमा स्वराज यांची राजकीय कारकिर्द: अवघ्या 25व्या वर्षी मंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या 'रणरागिणी'ची पराक्रमी गाथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 12:15 AM2019-08-07T00:15:31+5:302019-08-07T06:33:05+5:30
सुषमा स्वराज यांची माहिती: तीन वेळा आमदार, सात वेळा खासदार झालेल्या संवेदनशील राजकारणी काळाच्या पडद्याआड
देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. अर्थात, राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी, धडाकेबाज पराक्रम आणि अनेक विक्रम त्यांची कायमच आठवण करून देणारे आहेत.
1977 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी सुषमा स्वराज हरियाणाच्या कामगार मंत्री झाल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्या कायम स्मरणात राहतील. 1977 ते 1979 दरम्यान समाजकल्याण, कामगार यासारख्या आठ खात्यांची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. त्यानंतर वयाच्या 27व्या वर्षी त्या जनता पार्टीच्या हरियाणा प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या.
Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांचं शेवटचं ट्विट राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेलं; वाचून कराल सलाम! https://t.co/wa0vYNPtHf#SushmaSwaraj
— Lokmat (@MiLOKMAT) August 6, 2019
राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही सुषमा स्वराज यांची आठवण येईल. त्याशिवाय, पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही स्वराज यांच्या नावाची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात आहे.
देशाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर हे जबाबदारीचं पद भूषवणाऱ्या सुषमा स्वराज दुसऱ्या महिला नेत्या होत्या. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्या एकूण 11 निवडणुका जिंकल्या. त्या तीन वेळा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या, तर सात वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या.
A glorious chapter in Indian politics comes to an end. India grieves the demise of a remarkable leader who devoted her life to public service and bettering lives of the poor. Sushma Swaraj Ji was one of her kind, who was a source of inspiration for crores of people.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2019
मोदी सरकार-1 दरम्यान परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी केलेल्या कामाला तर तोड नव्हती. ट्विटरवरून साद घालणाऱ्या प्रत्येकाला सुषमांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते कुलभूषण जाधव आणि गीताच्या सुटकेसाठी मनापासून प्रयत्न केले होते. त्यासाठी देश त्यांचा कायमच कृतज्ञ राहील.