अपहृत ३९ भारतीयांची हत्या झाल्याचे उघड, सुषमा स्वराज यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:30 PM2018-03-20T23:30:56+5:302018-03-20T23:50:01+5:30

इसिस या दहशतवादी संघटनेने २०१४ मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व ३९ भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.

Sushma Swaraj disclosed that 39 Indians were killed in the abduction | अपहृत ३९ भारतीयांची हत्या झाल्याचे उघड, सुषमा स्वराज यांनी दिली माहिती

अपहृत ३९ भारतीयांची हत्या झाल्याचे उघड, सुषमा स्वराज यांनी दिली माहिती

Next

नवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेने २०१४ मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व ३९ भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.
या सर्वांना नेमके कधी ठार मारण्यात आले हे अद्याप समजू शकले नाही. ते सर्व पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालचे रहिवासी होते. इराकच्या मोसुल शहराजवळील बदूश गावातून हे मृतदेह मिळाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. तेथील एका कंपनीत हे भारतीय नागरिक काम करत होते.
मोसुल शहरातून इसिसने ४० भारतीयांचे अपहरण केले होते. यातील एक व्यक्ती बांगलादेशातील मुस्लीम असल्याचे सांगून निसटला होता. उर्वरित ३९ भारतीयांना बदूश येथे नेऊन त्यांची हत्या करण्यात आली. ज्या कंपनीत हे भारतीय काम करत होते त्याच कंपनीने ही माहिती दिली आहे.
सुषमा स्वराज यांनी सांगितले की, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी इराकमधील भारतीय राजदूत आणि इराक सरकारच्या एका अधिकाऱ्यासोबत बदूश शहरात जाऊन अपहृत भारतीयांचा शोध सुरू केला, तेव्हा स्थानिक लोकांनी सांगितले की, इसिसच्या दहशतवाद्यांनी काही मृतदेह दफन तिथे केले आहेत. राज्यमंत्री सिंह यांनी सांगितले की, रडारच्या माध्यमातून शोध घेतला असता खड्ड्यांमध्ये हे मृतदेह आढळून आले.

मृतदेह मिळाले, डीएनए झाले मॅच
सुषमा स्वराज यांनी सांगितले की, भारतीय अधिकाºयांनी आपल्या इराकी समकक्ष अधिकाºयांना मृतदेह बाहेर काढण्याची विनंती केली. येथे खोदकाम केल्यानंतर ३९ मृतदेह मिळाले आहेत. याशिवाय, काही ओळखपत्र, बूट आदी वस्तू मिळाल्या आहेत. हे मृतदेह डीएनए चाचणीसाठी बगदादला पाठविण्यात आले आहेत. तपासात ३८ भारतीयांचा डीएनए जुळून आला आहे. तर, ३९ व्या मृतदेहाचा डीएनए नातेवाइकांच्या डीएनएशी ७० टक्के जुळून आला आहे. हे मृतदेह भारतात आणण्यासाठी राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे इराकमध्ये जाणार आहेत.

मृतदेह आणण्यासाठी लागू शकतो आठवडा
या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले की, ही कायदेशीर प्रक्रिया आहे. इराककडून माहितीची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.

ममता बॅनर्जींनी व्यक्त केले दु:ख
कोलकाता : इराकमध्ये भारतीय नागरिकांना ठार मारल्याच्या घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी व्टिट केले आहे की, हे वृत्त ऐकून मी अतिशय दु:खी आहे. शोकाकूल कुटुंबांच्या सांत्वनासाठी शब्द पुरेसे नाहीत.

राहुल गांधी यांना धक्का
भारतीय नागरिकांच्या मृत्यूचे वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसला आहे, असे सांगत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आम्ही पीडित कुटुंबीयांसोबत असल्याचेही ते म्हणाले.

आपने मागितला स्वराज यांचा राजीनामा
चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंंग यांनी भारतीय नागरिकांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तर, आम आदमी पार्टीचे कंवर संधू यांनीही घटनेबाबत दु:ख व्यक्त करत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Web Title: Sushma Swaraj disclosed that 39 Indians were killed in the abduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.