UN मध्ये पाकिस्तानची खरडपट्टी काढणा-या सुषमा स्वराज कुलभूषण जाधव प्रकरणात उद्या संसदेत देणार निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 03:36 PM2017-12-27T15:36:04+5:302017-12-27T15:51:01+5:30
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात देण्यात आलेल्या वागणुकीवरुन सध्या दावे-प्रतिदावे सुरु आहेत.
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात देण्यात आलेल्या वागणुकीवरुन सध्या दावे-प्रतिदावे सुरु आहेत. या संपूर्ण प्रकरणावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन देणार आहेत. आधी राज्यसभेत सकाळी 11 वाजता त्यानंतर लोकसभेत 12 वाजता त्यांचे भाषण होईल.
चार दिवसांच्या सुट्टीनंतर आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधकांनी पाकिस्तानात जाधव कुटुंबीयांना देण्यात आलेल्या वागणुकीचा मुद्दा उपस्थित करत निषेध नोंदवला. 25 डिसेंबरला कुलभूषण जाधव यांची पत्नी चेतना आणि आई अवंती यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी पाकिस्तानने अत्यंत हिन दर्जाची वागणूक त्यांना दिली.
कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईला जी वागणूक देण्यात आली त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांना लवकरात लवकर भारतात परत आणा अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केली. शिवसेना, अण्णाद्रमुक, तृणमुल काँग्रेस या पक्षांनीही घोषणाबाजी करुन पाकिस्तानचा निषेध केला. भारताने या मुद्यावर शांत बसू नये असे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.
कुलभूषण यांच्या आई, पत्नीला काढायला लावले मंगळसूत्र, बांगड्या अन् टिकलीही
कुलभूषण यांची आई अवंती व पत्नी चेतनकुल यांनी इस्लामाबादहून परत आल्यानंतर मंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी सुरक्षेच्या नावाखाली या दोघींच्या सांस्कृतिक व धार्मिक भावनांचा अनादर केला गेला. यात त्यांना मंगळसूत्र, बांगड्या व कपाळावरील टिकलीही काढून ठेवायला लावली व सुरक्षेच्या दृष्टीने गरजचे नसूनही पेहराव बदलायला लावला. जाधव यांच्या आईची मातृभाषा मराठी असल्याने त्यांनी मुलाशी त्या भाषेत बोलणे स्वाभाविक होते. परंतु त्या मराठीत बोलू लागल्यावर वारंवार त्यांना थांबविले गेले व शेवटी मराठी बोलणे बंद करायला लावले गेले.
बुट जप्त केले
कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी खोलीत जाण्यापूर्वी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत.