सुषमा स्वराज यांनी अशी केली पाकिस्तानी लबाडीची ‘पोलखोल’

By admin | Published: August 23, 2015 01:42 AM2015-08-23T01:42:30+5:302015-08-23T01:42:30+5:30

सोमवारच्या दिल्लीतील बैठकीस येण्याची मनापासून इच्छा नसलेल्या पाकिस्तानने त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांना पत्रकार परिषद घ्यायला लावून आपल्या

Sushma Swaraj says Pakistan's 'fake' policeman | सुषमा स्वराज यांनी अशी केली पाकिस्तानी लबाडीची ‘पोलखोल’

सुषमा स्वराज यांनी अशी केली पाकिस्तानी लबाडीची ‘पोलखोल’

Next

नवी दिल्ली : सोमवारच्या दिल्लीतील बैठकीस येण्याची मनापासून इच्छा नसलेल्या पाकिस्तानने त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांना पत्रकार परिषद घ्यायला लावून आपल्या पळपुटेपणाचे खापर भारताच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अस्खलित हिंदीत अझीज यांच्या प्रत्येक मुद्द्याचे खंडन करून चेंडू पुन्हा पाकिस्तानच्या कोेर्टात टोलावला. परिणामी सोमवारची चर्चा खरंच रद्द झाली तर त्यांचे खापर पाकिस्तानच्या डोक्यावर फुटेल याची खात्री करून भारताने चर्चेआधी झालेल्या या राजनैतिक मुत्सद्देगिरीत बाजी मारली.
अझीज यांनी पुढे केलेली लटकी कारणे व स्वराज यांनी केलेली त्याची मुद्देनिहाय केलेली चिरफाड थोडक्यात अशी:
दहशतवाद व काश्मीरची सांगड
अझीज : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीत फक्त दहशतवादावरच चर्चा होईल, हे भारताचे म्हणणे आडमुठेपणाचे आहे. काश्मीर हा उभय देशांच्या दरम्यानचा सर्वात महत्वाचा अनिर्णित विषय असल्याने चर्चेतून तो वगळला जाऊ शकत नाही. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी रशियातील भेटीत सर्व प्रलंबित विषयांवर चर्चा सुरु करण्याचे ठरविले होते. त्यामुळे काश्मीरही त्यात ओघाने येणारच.
स्वराज : आता होणार असलेल्या चर्चेला द्विपक्षीय वाटाघाटी म्हणणे अयोग्य ठरेल. दोन्ही देशांनी आठ ठराविक विषयांवर वाटाघाटी करण्याचे व त्या कोणत्या पातळीवर करायच्या हे पूर्वी ठरविले होते. सुरुवातीस यास ‘स्ट्रक्चर्ड डायलॉग’ व नंतर ‘रिझ्युम्ड डायलॉग’ म्हटले गेले. यात काश्मीर हाच एकमेव कळीचा मुद्दा नाही. काश्मीरसह सर्व प्रलंबित मुद्द्यांवर वाटाघाटींतून मार्ग काढण्याचे ठरले होते. दोन्ही टप्प्यांना काही बैठका होऊन थोडीपार प्रगती झाली. परंतु पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या घटना घडल्या व हा ‘रिझ्युम्ड डायलॉग’ खंडित झाला व तो आजही खंडितच आहे.
या पार्श्वभूमीवर मोदी व नवाज शरीफ यांची रशियात उफा येथे भेट झाली. दहशतवाद व सीमेवर हल्ले सुरु असताना फलदायी चर्चा होणे शक्य नाही. त्यामुळे आधी यातून मार्ग काढावा व व्यापक व्दिपक्षीय ‘रिझ्युम्ड डायलॉग’साठी पोषक वातावरण तयार करावे, असे ठरले. त्यानुसार तीन प्रकारच्या बैठका घेण्याचे ठरले. एक, दहशतवादावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक, सीमेवरील हल्ल्यांच्या संदर्भात भारताच्या सीमा सुरक्षा दल व पाकिस्तानच्या पाकिस्तान रेंजर्सच्या महासंचालकांची बैठक आणि तीन, शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटनांविषयी दोन्ही देशांच्या ‘डायरेक्टर जनरल मिलिटरी आॅपरेशन्स’ची बैठक.
त्यामुळे भारत आगामी चर्चेसाठी नव्या पूर्वअटी घालत आहे किंवा काश्मीर समस्येच्या सोडवणुकीपासून पळ काढत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. वाटाघाटींसाठी पोषक वातावरण तयार झाल्यावर काश्मीरसह सर्वच अनिर्णित विषयांवर वाटाघाटी करण्यास भारत कटिबद्ध आहे. पण एवढे मात्र नक्की की आता ठरलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीसाठी फक्त दहशतवाद हा एकच विषय उभयपक्षी संमतीनेच ठरलेला आहे.
काश्मिरी फुटीरवाद्यांशी गुफ्तगू
सरताज अझीझ : मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ते त्यांच्या मर्जीनुसार, काश्मीरवर न बोलता, द्विपक्षीय संबंध सुरळित करू पाहात आहे. पण काश्मिरींचा हक्क डावलला जाऊ शकत नाही. काश्मिरच्या लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे व त्यासाठी त्यांना राजनैतिक, राजकीय व नैतिक पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानचे नेतृत्तव व जनता कटिबद्ध आहे. त्यासाठी काश्मिरमधील हुर्रियत नेत्यांशी बोलणे अपरिहार्य आहे. तसे केले नाही तर चर्चा निरर्थक ठरेल.
सुषमा स्वराज : या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. काश्मीर हा भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय विषय आहे व तो कोणत्याही त्रयस्थाला मध्ये न आणता सोडविण्याचे दोन्ही देशांनी सिमला करारानुसार मान्य केले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान चर्चेत हुर्रियतला कोणतेही स्थान असू शकत नाही.
भारताबरोबरचे संबंध सुधारू नयेत, यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या अनेक शक्ती पाकिस्तानात कार्यरत आहेत दुर्दैवाने तेथील राजकीय नेतृत्त्व त्यांच्या दबावाला बळी पडत आहे. दबाव आमच्यावरही आला, पण तो झुगारून आम्ही चर्चा रद्द न करण्यावर ठाम राहिलो. (लोकमत न्यूज नेटवर्क)

खाचखळग्यांचा बिकट मार्ग..
भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा मार्ग खाचखळग्यांचा आणी बिकट आहे. कितीही धक्के बसले व गाडी लडबडली तरी याच मार्गाने जाण्याखेरीज दोन्ही देशांना गत्यंतर नाही. प्रत्येक वेळी नवी उमेद बाळगून चर्चेला बसावे लागते. उमेद व हा मार्ग यापैकी काहीही सोडून चालणार नाही, असेही सुषमा स्वराज यांनी सांगितले.

Web Title: Sushma Swaraj says Pakistan's 'fake' policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.