सुषमा स्वराज यांची प्रतिमा डागाळली?
By admin | Published: June 15, 2015 12:21 AM2015-06-15T00:21:47+5:302015-06-15T00:21:47+5:30
भारतातून पलायन करून गेली अनेक वर्षे ब्रिटनमध्ये दडून बसलेले ‘आयपीएल’चे वादग्रस्त कमिशनर ललित मोदी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
भारतातून पलायन करून गेली अनेक वर्षे ब्रिटनमध्ये दडून बसलेले ‘आयपीएल’चे वादग्रस्त कमिशनर ललित मोदी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे एका ‘लीक’ झालेल्या ई-मेलवरून स्पष्ट झाल्यानंतर मोदी सरकारभोवती रविवारी एका नव्या वादाचे वादळ घोंगावत राहिले.
सुषमा स्वराज यांच्या या ‘अनैतिक’ कृत्यावरून काँग्रेस त्यांच्यावर तुटून पडली तर भाजप अध्यक्ष अमित शहा व गृहमंत्री राजनाथ सिंह स्वराज यांच्या बचावासाठी धावले. ‘यात नैतिकतेचा काही प्रश्नच येत नाही,’असे शहा यांनी निवेदन केले तर त्याहून एक पाऊल पुढे जात राजनाथ सिंह म्हणाले, ‘सुषमाजींनी केले ते बरोबरच आहे... सरकार त्यांच्या पाठिशी उभे आहे, हेही मी स्पष्ट करतो.’ दिवसभरात सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशीही या प्रकरणी चर्चा केली.
पण या सुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरणाचे कवित्व अद्याप संपलेले नाही, हे दिवसभराच्या घटनांवरून स्पष्ट झाले. पेंचप्रसंग तूर्तास टळला असला तरी स्वराज यांनी केलेल्या बचावाच्या टिष्ट्वट्सनंतरही अनुत्तरीत राहिलेले अनेक प्रश्न नजिकच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा पिच्छा पुरवीत राहतील. पी. व्ही. नरसिंह राव, माधव सिंग सोलंकी, एस. एम. कृष्णा व शशी थरूर मंत्री असतानाही हे मंत्रालय असेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
स्वराज दिवसभर पत्रकारांच्या समोर आल्या नाहीत पण किमान डझनभर टिष्ट्वट करून त्यांनी आपले म्हणणे मांडले. त्याने काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही व त्यांनी स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
समाजवादी पक्षासह काही पक्ष स्वराज यांच्या बचावासाठी पुढे आल्याने त्या या वादातून तूर्तास तरी बाहेर येतील. पण सुषमा स्वराज यांचे पती आणि पुतण्याच्या माध्यमातून समोर आलेल्या हितसंबंधांच्या संघर्षाचा विषय विरोधकांना पुढील अनेक दिवस टिकेला मसाला पुरवीत राहील. (या पुतण्याला कीथ वाझ यांच्या मदतीने लंडनच्या एका कॉलेजात प्रवेश मिळाला होता.) या पेंचप्रसंगामुळे मोदी-शहा-जेटली या त्रिमूर्तीला सरकार व पक्षातील नाराज वर्तुळांपासून दूर ठेवणे शक्य होईल, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
लंडनच्या ‘संडे टाइम्स’ने रविवारी जाहीर केलेल्या या वृत्तावरून हे सिद्ध झाले की, ललित मोदींना न्यायालयाने ‘फरार’ घोषित केलेले आहे. भारत सरकारसाठी ते ‘वॉन्टेड’ असूनही पत्नीच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना पोर्तुगालला जाऊ देण्याबाबत सुषमा स्वराज ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांश्ी जुलै २०१४ मध्ये सर्वप्रथम बोलल्या होत्या.