बचावासाठी सुषमांचा प्रतिहल्ला
By admin | Published: August 13, 2015 04:25 AM2015-08-13T04:25:15+5:302015-08-13T04:25:15+5:30
ललित मोदींना अनाठायी मदत केल्याच्या कारणास्तव परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी अडून बसलेल्या व स्थगन प्रस्ताव आणणाऱ्या काँग्रेसवर बुधवारी अर्थमंत्री अरुण जेटली
नवी दिल्ली : ललित मोदींना अनाठायी मदत केल्याच्या कारणास्तव परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी अडून बसलेल्या व स्थगन प्रस्ताव आणणाऱ्या काँग्रेसवर बुधवारी अर्थमंत्री अरुण जेटली आणि स्वत: स्वराज यांनी लोकसभेत तुफानी प्रतिहल्ला चढविला. या गदारोळात काँग्रेसने केलेल्या सभात्यागानंतर स्थगनप्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. स्थगन प्रस्तावाच्या निमित्ताने प्रत्युत्तर देण्यासाठी मिळालेली संधी स्वराज यांनी खुबीने प्रभावीपणे वापरली. स्वत:चा बचाव करतानाच त्यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळातील प्रकरणांवर बोट ठेवले. स्थगन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना जेटली यांनी राजीनाम्याची मागणी तर फेटाळलीच, शिवाय राहुल गांधींवर उपहासात्मक हल्ला चढविला.
चर्चेला सुरुवात करताना लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एक तासाच्या भाषणात स्वराज यांचे दावे पोकळ ठरवत नैतिकतेच्या आधारावर राजीनाम्याची मागणी लावून धरली. ललित मोदींचा पासपोर्ट बहाल करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान का देण्यात आले नाही, असा सवाल करीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भूमिकेबद्दलही संशय व्यक्त केला.
त्यावर स्वराज यांनी विस्ताराने बाजू मांडली. मदत करण्याच्या बदल्यात ललित मोदींकडून किती पैसे घेतले ते स्वराज यांनी सांगावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना स्वराज यांनी खासकरून राहुल गांधींनाच लक्ष्य बनविले. क्वात्रोचीकडून किती पैसे घेण्यात आले, ते मम्माला (सोनिया गांधी) विचारा. भोपाळ वायूकांडात १५ हजार लोकांचा बळी घेणाऱ्या अँडरसनला डॅडी राजीव गांधी यांनी का जाऊ दिले, असा सवाल करीत त्यांनी ललित मोदीप्रकरणी पैसे घेतल्याचा आरोप फेटाळून लावला.
मोदींना ब्रिटनमध्ये राहण्याचा अधिकार कसा मिळाला, असा सवाल हा पक्ष विचारत आहे. काँग्रेस सरकारच्याच काळात ते घडले आहे, असे त्या म्हणाल्या. कथित पासपोर्ट प्रकरणात माझे पती मोदींचे वकील नव्हते. मोदींच्या वकिलांच्या यादीत माझ्या मुलीचे नववे स्थान होते. तिला एकही पैसा मिळाला नाही. ज्येष्ठतेच्या यादीत नवव्या स्थानी असलेल्या कनिष्ठ वकिलाला कुणी कशाला पैसे देणार, असेही स्वराज म्हणाल्या.
स्वराज यांचे भाषण सुरू असताना काँग्रेसचे सदस्य घोषणा देत होते, तर सोनिया गांधी हेडफोन लावून लक्षपूर्वक ऐकत होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अरुण जेटलींचा राहुल गांधींना प्रतिटोला
स्वराज यांना कायम लक्ष्य बनविले जात असल्याचे सांगत जेटली म्हणाले की काँग्रेसला जीएसटीसारखी देशाच्या विकासाला महत्त्वपूर्ण ठरणारी सुधारणा विधेयके हाणून पाडायची आहेत. राहुल गांधी यांना ‘कोणतेही ज्ञान नसलेले तज्ज्ञ’ (एक्स्पर्ट विदाऊट नॉलेज) असे संबोधत त्यांना संसदेचे संपूर्ण अधिवेशन वेठीस धरण्यासाठी जबाबदार धरले. स्वराज यांच्या मुलीने ललित मोदींची वकिली केल्याबद्दल राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना जेटलींनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला. देशात काही लोकांच्या पिढ्यान्पिढ्या राजकारणात असून त्यांना काम करावे लागत नाही. काम न करताही त्यांनी चांगल्याप्रकारे आर्ट आॅफ लिव्हिंग शिकले आहे, असा शेराही त्यांनी मारला.
सुषमा स्वराज व राहुल गांधींची मंगळवारी संसदेच्या आवारात उभ्या उभ्या भेट झाली होती. या भेटीचा वृत्तान्त राहुल यांनी भर सभागृहात सांगून टाकला. ते म्हणाले की मी चाललो असताना समोरून आलेल्या स्वराज यांनी मला हाताला धरून थांबविले. ‘बेटा, तू मुझसे नाराज क्यूं हो,’ अशी विचारणाही केली. मी त्यांच्या नजरेला नजर भिडवून एव्हढेच सांगितले, की मी सत्य बोलत आहे. तुम्ही कशासाठी व कोणाच्या सांगण्यावरून ललित मोदींना मदत केली, हे सांगायला हवे. त्यानंतर त्यांची नजर
खाली झुकली !
या चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीवर बोट ठेवले. महात्मा गांधी यांची तीन माकडांची कहाणी सांगत त्यांनी मोदींची फिरकी घेतली. ‘बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो’ हे चरित्र मोदींच्या शासनकाळात खरे ठरले आहे, असेही ते म्हणाले.
आज कॅबिनेट कमिटीची बैठक
वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) घटनादुरुस्ती विधेयक संसदेत पारित करण्यास आता सरकार शेवटचा प्रयत्न करणार आहे. यासंदर्भात अनेक पर्यायांवर विचार करण्यासाठी संसदेच्या कॅबिनेट समितीची गुरुवारी बैठक बोलावण्यात आली आहे.