दहशतवादी हल्ल्यानंतर कतरिना कैफला भेटणार होता, प्लान ऐकून पोलिसांची उडाली झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 03:25 PM2018-01-09T15:25:50+5:302018-01-09T15:34:34+5:30
शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करताना मथुरामध्ये अटक करण्यात आलेल्या काश्मीरी तरुण अहमद वानीने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे पोलिसांची झोप उडाली होती
नवी दिल्ली - शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करताना मथुरामध्ये अटक करण्यात आलेल्या काश्मीरी तरुण अहमद वानीने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे पोलिसांची झोप उडाली होती. मथुरा जीआरपीच्या अधिका-याने एक तरुण विनातिकीट संशयितपणे प्रवास करत असल्याची माहिती मिळाली होती, ज्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. चौकशी केली असता त्याने आपण काश्मीरचा राहणारा असून आपलं नाव बिलाल अहमद वानी असल्याचं सांगितलं होतं. त्याने दिलेली माहिती ऐकून पोलिसांची झोपच उडाली होती. त्याने सांगितलं होतं की, आपण त्या तीन दहशतवाद्यांपैकी एक आहोत ज्यांनी अक्षरधाम मंदिरावर हल्ल्याची योजना आखली आहे. 26 जानेवारीला हा हल्ला करणार होते. माहिती मिळताच, उत्तर प्रदेश एटीएसचं एक पथक मथुरेत पोहोचलं आणि शोधाशोध सुरु केली. यावेळी काश्मिरी तरुणाने दीड लाखांची फसवणूक करणा-या दोघांनी धडा शिकवण्यासाठी खोटी माहिती दिल्याचं समोर आलं.
चौकशीदरम्यान बिलालने सांगितलं होतं की, 'आपण पुलगामचे रहिवासी असून आपले दोन साथीदार मोहम्मद अशरफ मीर आणि मुदस्सिर अहमदसोबत स्पाईसजेटने दिल्लीला पोहोचलो होतो. दिल्लीमधील जामा मस्जिदजवळ असणा-या हॉटेल अल रशीदच्या रुम नंबर 201 मध्ये आपण थांबलो होतो. तिघेही अक्षरधाम मंदिरावर हल्ल्याचा कट आखत होते. प्लान अंतिम स्टेजवर होता'. चौकशीदरम्यान बिलला बोलला होता की, टायगर जिंदा है चित्रपट पाहिल्यानंतर कतरिना कैफला भेटणं आपलं स्वप्न होतं. मंदिरावर हल्ला केल्यानंतर आपली कतरिनाला भेटण्याची इच्छा होती.
पोलिसांनी सक्तीने चौकशी केली असता बिलाल आपल्या जबाबावरुन पलटला. बिलालने सांगितलं की, पैसे दुप्पट करायचं सांगून दोन तरुणांनी आपली फसवणूक केली होती. एटीएसने स्पेशल सेलच्या सहाय्याने हॉटेलमध्ये नोंद असणा-यांची तपासणी केली. बिलालकडे सापडलेल्या ओळखपत्राचीही तपासणी करण्यात आली. पण सर्व काही योग्य असल्याचं समोर आलं. बिलालच्या कुटुंबाचं मेडिकल स्टोअर असल्याचं तपासात समोर आलं. कोणतंही दहशतवादी कनेक्शन नसल्याचं तपासात निष्पन्न झालं. आपल्या फसवणा-यांना धडा शिकवण्यासाठी बिलालने पोलिसांना खोटी माहिती दिली होती.