दिल्लीत CRPFच्या वर्दीतील संशयित ताब्यात, दोन प्रश्नांतच उडाली भंबेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 01:41 PM2019-04-28T13:41:04+5:302019-04-28T13:41:25+5:30
केंद्रीय औद्योगिक दला(CISF)च्या जवानांनी दिल्लीतल्या चांदणी चौकातल्या मेट्रो स्टेशनमधून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
नवी दिल्ली- केंद्रीय औद्योगिक दला(CISF)च्या जवानांनी दिल्लीतल्या चांदणी चौकातल्या मेट्रो स्टेशनमधून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. ज्यानं CRPFचा गणवेश परिधान केला होता. पकडण्यात आलेल्या व्यक्तीनं स्वतःचं नाव नदीम खान असल्याचं सांगितलं आहे. तसेच तो शामलीचा रहिवासी असल्याचंही समजलं आहे.
चौकशीदरम्यान त्यानं दावा केला आहे की, तो CRPFचा ट्रेनी आहे आणि श्रीनगरमध्ये त्याची ट्रेनिंग सुरू आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी शामली आल्याचंही त्यानं CISFला सांगितलं आहे. परंतु चौकशी केली असता त्याच्या आई-वडिलांची प्रकृती उत्तम असल्याचं उघड झालं आहे. तसेच तो श्रीनगरमध्ये कोणतंही ट्रेनिंग घेत नसल्याचं समोर आलं आहे. त्या संशयित व्यक्तीजवळ दोन आधारकार्ड सापडले. ज्यात वेगवेगळ्या जन्मतारखा आहेत. या संशयित व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे.
सध्या तपास यंत्रणा त्या व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. दुसरीकडे श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर ते दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. त्यामुळे दहशतवादी काही अनुचित प्रकारही घडवू शकतात.