नोकरी गेली, लग्नही तुटलं...; सैफ हल्ला प्रकरणात चुकून पकडलेल्या आकाशचे आयुष्य उद्ध्वस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:46 IST2025-01-27T17:43:35+5:302025-01-27T17:46:30+5:30

सैफ हल्ला प्रकरणातील संशयित तरुणाच्या आयुष्यात पोलिसांच्या चुकीमुळे वादळ निर्माण झालं आहे.

Suspect who was earlier detained by the police in the attack on Saif Ali Khan has demanded justice | नोकरी गेली, लग्नही तुटलं...; सैफ हल्ला प्रकरणात चुकून पकडलेल्या आकाशचे आयुष्य उद्ध्वस्त!

नोकरी गेली, लग्नही तुटलं...; सैफ हल्ला प्रकरणात चुकून पकडलेल्या आकाशचे आयुष्य उद्ध्वस्त!

Saif Ali Khan Attack Case: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र शरीफुलला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी छत्तीसगडमधील दुर्ग येथून एका व्यक्तीला हल्ला प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. मात्र नंतर त्याला सोडून देण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्या संशयित तरुणाचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला. संशयित म्हणून फोटो व्हायरल झाल्यामुळे आता या तरुणाला आणि त्याच्या कुटुंबियांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं आहे.

तरुणाच्या आयुष्यात मोठं संकट

सैफ अली खानवर हल्ला केल्याच्या संशयावरून छत्तीसगड पोलिसांनी दुर्ग रेल्वे स्थानकावर पकडलेला आकाश कनौजिया हा तरुण निर्दोष निघाला आहे. पोलिसांनी त्याला चौकशीनंतर सोडूनही दिले. पण पोलिसांनी पकडून चौकशी केल्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागत आहे. या सगळ्या प्रकारानंतर आकाशची इतकी बदनामी झाली की त्याची नोकरी गेली. दुसरीकडे त्याचे लग्नही मोडले. आकाशसोबत लग्न करण्यास तरुणीने त्याच्या अटकेची बातमी बघून नकार दिला आहे. त्यामुळे आता या तरुणाच्या आयुष्यात मोठं संकट निर्माण झालंय.

पोलिसांनी चौकशीनंतर सोडून दिलं

जुहू पोलिसांच्या माहितीच्या आधारे छत्तीसगड पोलिसांनी आकाश कनोजिया या तरुणाला दुर्ग रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले होते. घटनेच्या वेळी आकाश ट्रेनमधून होणाऱ्या पत्नीला भेटायला जात होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. तो सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीसारखा दिसत असल्याचा रेल्वे पोलिसांचा समज झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरु केली. मात्र चौकशीनंतर पोलिसांनी त्याला सोडून दिलं.

धावत्या रेल्वेतून घेतलं ताब्यात

संशयीत आकाश कैलाश कनोजियाला रेल्वे सुरक्षा दलाने धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग करून पकडलं होतं. सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा संशयीत म्हणून एकाचा फोटो तपास यंत्रणांनी सर्वत्र पाठवला होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये संशयीत कनोजियाचा शोध घेणे सुरू केले. प्रत्येक डब्यात फोटोच्या आधारे कसून तपासणी सुरू असतानाच संशयीत कनोजिया आढळला. त्यानंतर पकडण्यात आलेल्या कनोजियाची माहिती आणि फोटो मुंबई पोलिसांना पाठवण्यात आले. त्यानंतर व्हीडीओ कॉल करून त्याची ओळख पटवण्यात आली. 

तरुणीचा लग्नास नकार

पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर आकाश कनोजिया त्याच्या घरी पोहोचला. मात्र त्यानंतर त्याच्या आयुष्यात खरं वादळ आलं.  आकाशच्या अटकेच्या बातमीवर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी अनेक वक्तव्ये केली. सैफ अली खानचा हल्लेखोर म्हणून अनेकांनी बातम्या देखील चालवल्या. यामुळे त्याच्या कंपनीने त्याला कामावरुन काढून टाकलं. विवाह ठरलेल्या तरुणीनेसुद्धा  त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे आकाश आता नैराश्यात गेलाय. छत्तीसगड पोलिसांनी स्पष्टीकरण दिले असलं तरी आता खूप उशीर झाला आहे.
 

Web Title: Suspect who was earlier detained by the police in the attack on Saif Ali Khan has demanded justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.