उत्तर प्रदेशातील आश्रमात २ साधूंचा संशयास्पद मृत्यू; विषप्रयोगाच्या आरोपानं गूढ वाढलं
By कुणाल गवाणकर | Published: November 21, 2020 07:52 PM2020-11-21T19:52:39+5:302020-11-21T19:53:40+5:30
साधूंच्या मृत्यूची माहिती पसरताच राज्यात खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू
मथुरा: उत्तर प्रदेशातल्या मथुरेतील गोवर्धनमधील जंगलात असलेल्या आश्रमात दोन साधूंचे मृतदेह आढळून आले आहेत. या साधूंच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. साधूंच्या मृत्यूची माहिती समजताच परिसरात खळबळ माजली. डीएम, एसएसपीसह पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
एका साधूंची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आश्रमात असलेल्या गायीच्या दूधापासून चहा प्यायल्यानंतर ही घटना घडल्याचं समजतं. विष देऊन हत्या करण्यात आल्याचा आरोप एका साधूंच्या भावानं केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर्धनच्या गिरीराज बागेच्या मागे तीन साधू एका वर्षापासून आश्रम तयार करून राहत होते. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास दोन साधूंच्या मृत्यूची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे एकच खळबळ माजली.
गोपाल दास आणि श्याम सुंदर दास अशी मृत्यूमूखी पडलेल्या दोन साधूंची नावं आहेत. तर रामबाबू दास यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विष देऊन साधूंची हत्या करण्यात आल्याचा आरोप गोपाल दास यांचे भाऊ टीकम यांनी केला. आश्रमातून विषारी औषधांचा वास येत असल्याचा दावादेखील त्यांनी केला. या प्रकरणात चित्रीकरण करण्यात येईल अशी माहिती एसएसपींनी दिली.