CoronaVirus: कोरोना पसरवत असल्याच्या संशयातून तबलिगी जमातच्या एकाला मारहाण; रुग्णालयात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 09:22 AM2020-04-09T09:22:58+5:302020-04-09T09:25:04+5:30
तबलिगी जमातच्या कार्यक्रमाहून परतलेल्या तरुणाला ग्रामस्थांची मारहाण
दिल्ली: निझामुद्दीनमध्ये आयोजित केल्या गेलेल्या मरकजमुळे देशभरातून तबलिगी जमातला रोषाला सामोरं जावं लागतं आहे. दिल्लीच्या बवानामध्ये एका २२ वर्षीय तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. कोरोना पसरवल्याचा कट रचल्याच्या आरोपातून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी बुधवारी याबद्दलची माहिती दिली. हा तरुण बवानाच्या हरेवली गावचा रहिवासी होता.
मारहाणीत मरण पावलेला तरुण तबलिगी जमातच्या एका कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये गेला होता. तो ४५ दिवसांनंतर भाजीपाल्याच्या एका ट्रकमधून दिल्लीला परतला. त्याला आझादपूरमधल्या भाजी मंडईत रोखण्यात आलं. मात्र तपासणीनंतर त्याला सोडलं गेलं. तो गावात पोहोचल्यानंतर काही जणांनी त्याच्याबद्दल अफवा पसरवली. तो कोरोना विषाणूचा फैलाव करण्याच्या हेतूनं योजना आखून गावात परतल्याची अफवा गावभर पसरली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तबलिगी जमातच्या कार्यक्रमावरुन परतलेल्या तरुणाला रविवारी काही जणांनी शेतात नेलं. तिथे त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली.