प्रजापती यांना जामीन देणारे न्यायाधीश निलंबित
By admin | Published: April 30, 2017 12:55 AM2017-04-30T00:55:02+5:302017-04-30T00:55:02+5:30
समाजवादी पार्टीचे नेते आणि माजी मंत्री गायत्री प्रजापती यांना जामीन देणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशाला शुक्रवारी निलंबित करण्यात आले. या न्यायाधीशाची विभागीय
अलाहाबाद : समाजवादी पार्टीचे नेते आणि माजी मंत्री गायत्री प्रजापती यांना जामीन देणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशाला शुक्रवारी निलंबित करण्यात आले. या न्यायाधीशाची विभागीय चौकशी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल या प्रकरणाची चौकशी करतील. रजिस्ट्रार जनरल डी. के. सिंह यांनी या घडामोडींना दुजोरा दिला आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने शुक्रवारी प्रजापती यांच्या जामिनाला स्थगिती दिली होती. प्रजापती यांना अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या आईवर बलात्कार केल्याचाही आरोप आहे. त्यांना बुधवारी पॉक्सो न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. प्रजापती यांच्या दोन सहकाऱ्यांनाही जामीन मिळाला होता. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एकेक लाख रुपयांचा वैयक्तिक जात मुचलका भरण्यास सांगितले होते. उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाने १५ मार्च रोजी प्रजापती यांना आशियाना भागात अटक केली होती. त्यांना जामीन मंजूर करणारे अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ओम प्रकाश मिश्र यांना उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने निलंबित केले आहे. त्यांचे अधिकार गोठविण्यात आले आहेत. ते पॉक्सो न्यायालयात कार्यरत होते. मुख्य न्यायाधीशांनी न्यायाधीश मिश्र यांना निलंबित करण्यासह प्रजापती यांना जामीन देण्याच्या त्यांच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली.
- गंभीर गुन्ह्यात ज्या पद्धतीने जामीन देण्याची घाई करण्यात आली त्यावरून आम्हाला न्यायाधीशांच्या हेतूविषयी शंका वाटत आहे, असे मुख्य न्यायाधीशांनी म्हटले.
- प्रजापती यांना जामीन देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सरकारच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मिश्र यांच्यावर कारवाईचे संकेत मिळाले होते.