लोकसभा अध्यक्षांबाबत सस्पेन्स, २६ जूनला होणार मतदान; कोण होणार लोकसभेचा स्पीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 08:26 PM2024-06-13T20:26:25+5:302024-06-13T20:27:33+5:30
Lok Sabha Speaker: लोकसभेत एनडीए'ने बहुमत मिळवले, नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आता लोकसभेचे अध्यक्षपद एनडीए'तील कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत.
Lok Sabha Speaker: लोकसभेत एनडीए'ने बहुमत मिळवले, नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आता लोकसभेचे अध्यक्षपद एनडीए'तील कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. रविवारी ९ जून शपथ घेतल्यानंतर सोमवारी सर्व मंत्र्यांच्या खात्यांचे वाटपही झाले असून, सरकारने कामाला सुरुवात केली आहे. आता सर्वांच्या नजरा लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. २६ जून रोजी ही निवडणूक होणार आहे.
अजित डोवाल यांच्यावरच पंतप्रधान मोदींचा विश्वास; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून तिसरी टर्म
२७ जून रोजी राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. त्याच दिवशी सकाळी ११ वाजता राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. याआधी सर्व नवनिर्वाचित लोकसभेच्या खासदारांना शपथ देण्यासोबतच नवे सभापतीही निवडले जाणार आहेत. २४ आणि २५ जून रोजी प्रोटेम स्पीकर नवीन खासदारांना शपथ देतील.
भाजप लोकसभा अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 'लोकसभा अध्यक्षपदासाठी कोणत्याही मित्रपक्षाकडून कोणतीही मागणी आलेली नाही. भाजप लवकरच पक्षीय पातळीवर याचा विचार करेल आणि पक्षाने नाव निश्चित केल्यानंतर एनडीएच्या मित्रपक्षांशीही चर्चा करून त्या नावावर एकमत केले जाईल',अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये मध्य प्रदेशातील इंदूर येथील भाजपच्या लोकसभा खासदार सुमित्रा महाजन यांची सभापतीपदी निवड झाली आणि दुसऱ्या टर्ममध्ये राजस्थानमधील कोटा येथील भाजप खासदार ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली, २०१९ च्या तुलनेत लोकसभेत बहुमत नाही, त्यामुळे टीडीपी लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करत आहे. अनेक ठिकाणी लोकसभेच्या अध्यक्षपदी जेडीयूची निवड झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या, मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर लोकसभेच्या नवीन सभापतींच्या नावावर चर्चा होणार आहे. भाजप पक्षीय पातळीवर लोकसभेच्या सभापतीचे नाव ठरवेल, त्यानंतर मित्रपक्षांशी या नावावर चर्चा केली जाईल. मित्रपक्षाकडून काही सूचना किंवा मागणी आल्यास भाजप नवीन फॉर्म्युल्याचा विचार करेल.