CBI च्या समन्सला स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा मनमोहन सिंगना दिलासा
By admin | Published: April 1, 2015 11:52 AM2015-04-01T11:52:26+5:302015-04-01T12:55:14+5:30
सीबीआय विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात बजावलेल्या समन्सवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणल्याने डॉ. मनमोहन सिंग यांना दिलासा मिळाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - सीबीआय विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात बजावलेल्या समन्सवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणल्याने डॉ. मनमोहन सिंग यांना दिलासा मिळाला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीसही बजावली असून उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
कुमार मंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीस ओडिशातील तालबिरा-२ हा कोळसा खाणपट्टा देण्यास माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रस्थापित पद्धतीचा भंग करून संमती दिल्याने या खासगी कंपनीस मोठ्या नफ्याचे घबाड मिळाले व परिणामी सरकारी न्येवेली लिग्नाईट कॉर्पोरेशनचे नुकसान झाल्याचे सकृद्दर्शनी दिसते असे मत नोंदवत ‘सीबीआय’ विशेष न्यायालयाने डॉ. सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात आरोपी करत ८ एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी समन्स जारी केले होते. डॉ. सिंग यांच्याखेरीज उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी.सी. पारख, हिंदाल्को कंपनी व हिंदाल्कोचे वरिष्ठ अधिकारी शुभेंदू अमिताभ आणि डी. भट्टाचार्य यांनाही समन्स जारी करण्यात आले होते. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने डॉ. सिंग व इतरांवरील समन्सला स्थगिती दिली.