सेल्फी काढाल तर कॉलेजमधून निलंबन
By admin | Published: January 11, 2017 01:02 AM2017-01-11T01:02:56+5:302017-01-11T01:02:56+5:30
दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाउसमध्ये नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या परिसरात विद्यार्थींनींना आता सेल्फी घेता येणार नाही.
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाउसमध्ये नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या परिसरात विद्यार्थींनींना आता सेल्फी घेता येणार नाही. एवढेच काय, त्यांना कंगव्याने केसही विंचरता येणार नाहीत. असे केल्यास निलंबित करण्याचा इशाराच प्रशासनाने दिला.
मिरांडा हाउसच्या विद्यार्थीनी रविवारी स्कूल आॅफ ओपन लर्निंगमध्ये (एसओएल) गेल्या असता त्यांना ही नोटीस दिसली. सेल्फीसारखे प्रकार म्हणजे वेळेचा दुरुपयोग असल्याचे या नोटिशीत म्हटले आहे. दरम्यान, येथील क्रांतिकारी विद्यार्थी संघटनेने हा आदेश महिला विरोधी असल्याचे म्हटले आहे. याविरुद्ध आपण महिला आयोगाकडे धाव घेणार असल्याचेही या संघटनेने स्पष्ट केले आहे.
नोटिशीत म्हटले आहे की, अनेक विद्यार्थिनी या परिसरात सेल्फी घेतात, केस विंचरतात व मॉडेलिंग करत असल्याचे दिसून आले आहे. हा वेळेचा दुरुपयोग आहे. महाविद्यालय याला परवानगी देणार नाही. एखाद्या विद्यार्थीनीने नियमभंग केल्यास तिला त्या दिवसासाठी निलंबित करण्यात येईल आणि महाविद्यालय परिसराच्या बाहेर काढण्यात येईल. मिरांडा हाऊस आणि येथील शिक्षक नेहमीच आपल्या उच्च शिक्षणासाठी संघर्षरत राहिलेले आहेत. आम्हाला आशा आहे की, विद्यार्थीनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करतील, असेही यात म्हटले आहे.
प्राचार्यांनीही दिला दुजोरा
मिरांडा हाऊस महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रतिभा जॉली यांनी या नोटिशीबाबत दुजोरा दिला आहे. सुरक्षेबाबत अंतर्गत चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कारण, या परिसरात विद्यार्थीनी नेहमीच सेल्फी घेत असल्याचे दिसून येत आहे. एसओएलचे संचालक सी.एस. दुबे यांनी सांगितले की, या नोटिशीबाबत काही माहिती नाही.
काय आहे मिरांडा हाउस?
मिरांडा हाउस हे दिल्ली विद्यापीठातील ‘रेसिडेन्शियल कॉलेज फॉर वूमेन’ आहे. १९४८ मध्ये याची स्थापना झालेली आहे. दिल्ली विद्यापीठात महिलांच्या ज्या प्रमुख इन्स्टिट्यूट आहेत त्यापैकी ही एक इन्स्टिट्यूट आहे.