कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती
By Admin | Published: May 10, 2017 03:07 AM2017-05-10T03:07:12+5:302017-05-10T07:42:35+5:30
हेरगिरी व विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या आणि पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने
नवी दिल्ली : हेरगिरी व विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या आणि पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांच्या शिक्षेला नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस) स्थगिती दिली आहे. भारताच्या मुसद्दीगिरीचा हा मोठा विजय असून आता कुलभूषण यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याचे मानले जात आहे.
‘इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस’ने यासंदर्भात एक पत्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही पाठविले आहे. विशेष म्हणजे भारताने यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाचे दार ठोठावले होते. त्यानंतर ‘इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस’ या संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. व्हिएन्ना कराराचा पाकिस्तानने भंग केल्याचे भारताने म्हटले होते; तसेच फाशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
कुलभूषण मुंबईच्या पवई भागात राहणारे असून, त्यांचा हेरगिरीशी संबंध नाही, असे भारताने तसेच कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. कुलभूषण यांच्यावर पाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार कोर्ट मार्शल चालवून त्यात त्यांना दोषी ठरवून पाकने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. (वृत्तसंस्था)
ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे यांनी कुलभूषण यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कमपणे मांडली, असे टिष्ट्वट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केल्याचे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे न्यायालयास पटवून दिले.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय कुलभूषण यांच्या आईला कळविला आहे.I have spoken to the mother of #KulbhushanJadhav and told her about the order of President, ICJ under Art 74 Paragraph 4 of Rules of Court.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 9, 2017
- सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फाशीला दिलेली स्थगिती हा कोणाचा विजय किंवा पराभव नाही. या निर्णयामुळे कुलभूषण यांना काहिसा दिलासा मात्र जरूर मिळाला आहे. पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय कायद्यानुसारच न्यायदानाचे काम करावे लागेल, असे अॅड. हरिश साळवे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.
हेकेखोरपणाला चापजाधव यांना ताब्यात घेऊन अटक करेपर्यंत पाकिस्तानने माहितीच दिली नव्हती. पाकच्या या हेकेखोरपणाला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाने चाप बसला आहे.
जाधव यांच्या अटकेनंतर पाकचा असा होता दावा-
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी होते. ते भारताच्या रीसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकचा दावा आहे.
पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार जाधव यांस गेल्या वर्षी ३ मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक करण्यात आली. त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल, असे दाखवले होते.
त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना १२ मे २0१४ रोजी
पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकने या आरोपाच्या समर्थनार्थ त्यांच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली होती.