सुरेंद्र कोलीच्या फाशीला स्थगिती
By Admin | Published: September 8, 2014 09:28 AM2014-09-08T09:28:24+5:302014-09-08T10:57:40+5:30
बहुचर्चित निठारी हत्याकांडातील दोषी सुरेंद्र कोलीच्या फाशीला सुप्रीम कोर्टाने सात दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. १० सप्टेंबर रोजी सुरेंद्र कोलीला फाशीला दिली जाणार होती.
ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. ८- बहुचर्चित निठारी हत्याकांडातील दोषी सुरेंद्र कोलीच्या फाशीला सुप्रीम कोर्टाने सात दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. १० सप्टेंबर रोजी सुरेंद्र कोलीला फाशीला दिली जाणार होती. मात्र सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने सुरेंद्र कोलीची फाशी लांबणीवर पडली आहे.
नोएडातील निठारी हत्याकांडाप्रकरणी दोषी ठरलेल्या सुरेंद्र कोलीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यावर सुरेंद्र कोलीला फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. १० सप्टेंबरला कोलीला फाशी दिली जाण्याची दाट शक्यता होती. यासाठी कोलीला उत्तरप्रदेशमधील मेरठमधील तुरुंगात हलवण्यात आले होते. तुरुंग प्रशासनानेही कोलीला फाशी देण्यासाठी तयारीही सुरु केली. मात्र सोमवारी पहाटे चारच्या सुमारास सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची फॅक्सची प्रत तुरुंग प्रशासनाकडे आली आहे. यात कोली याच्या फाशीला सात दिवसांसाठी स्थगिती देण्यात आल्याचे म्हटले आहे.
निठारी येथे नऊ वर्षांपूर्वी पाच लहान मुलांचे अपहरण करुन हत्या केल्याचे संतापजनक प्रकरण समोर आले होते. यात कोर्टाने सुरेंद्र कोलीला दोषी ठरवत त्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती.