गोव्यातील ‘हेलि टुरिझम’ला स्थगिती
By admin | Published: February 5, 2016 04:08 AM2016-02-05T04:08:15+5:302016-02-05T04:08:15+5:30
उत्तर गोव्यातील आग्वाद येथील पठाराचा वापर हेलिकॉप्टर पर्यटनासाठी केला जाऊ नये, म्हणून कळंगुटमधील काही राजकारणी आणि लोकांनी आंदोलन चालविले होते
पणजी : उत्तर गोव्यातील आग्वाद येथील पठाराचा वापर हेलिकॉप्टर पर्यटनासाठी केला जाऊ नये, म्हणून कळंगुटमधील काही राजकारणी आणि लोकांनी आंदोलन चालविले होते. त्याची दखल घेऊन सरकारने हेलिकॉप्टर पर्यटन तूर्त स्थगित ठेवावे, असा निर्णय बुधवारी घेतला आहे.
मंगळवारीच सरकारने पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली होती. दहा मिनिटांसाठी प्रति माणशी ३ हजार २०० रुपये दराने ३६ पर्यटकांनी मंगळवारी या सेवेचा लाभही घेतला. या व्यतिरिक्त १०० पर्यटकांनी हेलिकॉप्टर सेवेसाठी आरक्षण केले होते. तथापि, भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी लोकांना घेऊन आंदोलन सुरू केले. आग्वादच्या पठारावर वारंवार हेलिकॉप्टर्स उतरल्याने तिथे ध्वनी प्रदूषण होईल व त्याचा त्रास स्थानिकांना होईल, अशी तक्रार करून आग्वाद येथे असलेल्या हेलिपॅडचा
वापर करण्यास लोकांनी विरोध केला.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या स्थितीची दखल घेतली व लोबो यांना समजावले, तसेच हेलिकॉप्टर पर्यटन तूर्त स्थगित ठेवावे, असा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांना कळविला. (खास प्रतिनिधी)