अॅसिड पीडितेसोबत सेल्फी काढणा-या पोलिसांचं निलंबन

By admin | Published: March 25, 2017 07:58 AM2017-03-25T07:58:06+5:302017-03-25T08:00:57+5:30

अॅसिड हल्ल्यातील पीडितेसोबत सेल्फी काढल्याने उत्तर प्रदेशमधील तीन महिला पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे

Suspension of police with acid attack victims | अॅसिड पीडितेसोबत सेल्फी काढणा-या पोलिसांचं निलंबन

अॅसिड पीडितेसोबत सेल्फी काढणा-या पोलिसांचं निलंबन

Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 25 - अॅसिड हल्ल्यातील पीडितेसोबत सेल्फी काढल्याने उत्तर प्रदेशमधील तीन महिला पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अॅसिड हल्ल्यातील या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावेळी तिथे उपस्थित या महिला कॉन्स्टेबलनी तिच्यासोबत सेल्फी काढला होता. 
 
पीडित महिला रायबरेलीतील उंचाहार परिसरात राहणारी आहे. गंगा - गोमती एक्स्प्रेसने आपल्या घरी लखनऊला ती चालली असताना दोघांनी तिला जबरदस्तीने अॅसिड पाजण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमध्ये पीडिता गंभीर जखमी झाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीरपणे दखल घेतली होती. इतकंच नाही तर शुक्रवारी सकाळी त्यांनी स्वत: जाऊन पीडित महिलेची रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली होती. 
 
पीडित महिलेच्या सुरक्षेसाठी तीन महिला कॉन्स्टेबलना तैनात करण्यात आलं होतं. यावेळी माणुसकीला लाजवेल असं कृत्य करत त्यांनी बेडवर असहाय्य अवस्थेत पडलेल्या त्या पीडितेसोबत सेल्फी काढला होता. त्यांचा हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून चौकशी सुरु आहे. 
 
अॅसिड हल्ल्याच्या या प्रकरणाचा तपास करताना उत्तर प्रदेश पोलिसांनी तत्परता दाखवत शुक्रवारीच रायबरेलमधील उंचाहार परिसरात दोन्ही आरोपींनी अटक केली होती. गुड्डू सिंह आणि भौंदू सिंह अशी या आरोपींची नावे आहेत. याशिवाय हलगर्जीपण केल्याप्रकरणी आरपीएफच्या चार जवानांचं तात्काळ निलंबन करण्यात आलं आहे. यासोबत उत्तर प्रदेश प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेशी संबंधित तक्रारींसाठी एक व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. ज्यांना आपली तक्रार नोंदवायची आहे ते 9454404444 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करु शकतात. धक्कादायक म्हणजे या 45 वर्षीय महिला आणि दोन मुलांच्या आईवर याआधीही सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्याच्या हेतून अॅसिड हल्ला करण्यात आला होता. 
 

Web Title: Suspension of police with acid attack victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.