पोलीस ठाण्यात डान्स करणा-या 'त्या' पोलीस कर्मचा-याचं निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 09:03 AM2017-12-05T09:03:59+5:302017-12-05T09:06:04+5:30
पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन करण्यात आलं आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सधन मोंडल यांचा पोलीस ठाण्यात डान्स करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
कोलकाता- पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन करण्यात आलं आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सधन मोंडल यांचा पोलीस ठाण्यात डान्स करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. एखाद्या पार्टीत नाचत असल्याप्रमाणे ते पोलीस ठाण्यात डान्स करत होते. यावेळी दुसरा पोलीस कर्मचारी व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असताना, तिथे उपस्थित महिला पोलीस कर्मचारी टाळ्या वाचून कौतुक करत होत्या. विशेष म्हणजे, कारागृहात बंद कैद्यांसमोरच हा सगळा प्रकार सुरु होता.
सधन मोंडल यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठांनी कारवाई करत त्यांचं निलंबन केलं आहे. यासोबत ज्या पोलीस कर्मचा-याने या व्हिडीओचं रेकॉर्डिंग करुन, ऑनलाइन अपलोड केला त्याचंही निलंबन करण्यात आलं आहे. निलंबन करण्यात आलेले पोलीस कर्मचारी आसनसोल येथील हिरापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशीचा आदेश दिला आहे. निलंबित पोलीस कर्मचा-यांना स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं आहे. यासोबतच जेव्हा हा डान्स सुरु होता तेव्हा बाहेरील अन्य कोणी उपस्थित होतं का ? याचाही तपास सुरु आहे.
नेमका काय प्रकार ?
पोलीस स्टेशनमध्ये बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करतानाचा एका पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. एक पोलीस कर्मचारी बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकताना दिसत होता. तर दुसरा पोलीस त्या नाचणाऱ्या पोलिसाचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. नाचणा-या पोलीस कर्मचा-याचं नाव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सधन मोंडल असं आहे.
व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी ड्युटीवर असताना बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करतो आहे. तर पोलीस स्टेशनमधील काही महिला अधिकारी टाळ्या वाजवताना व हसताना दिसत आहे. एक मिनिटांची ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.