मध्य प्रदेश राज्यपालांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: March 26, 2015 01:02 AM2015-03-26T01:02:20+5:302015-03-26T01:02:20+5:30
मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांचा पुत्र शैलेश याचा लखनौमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे.
लखनौ : मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांचा पुत्र शैलेश याचा लखनौमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात सध्या गाजत असलेल्या व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या घोटाळ््यात राज्यपाल यादव यांच्याप्रमाणेच ५० वर्षीय शैलेशही आरोपी आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मुलाच्या मृत्यूचे वृत्त थडकताच अस्वस्थ झालेल्या राज्यपाल यादव यांना भोपाळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
कोट्यवधी रुपयांच्या ‘व्यापमं’ घोटाळ्यातील आरोपी असलेल्या शैलेशचा मृतदेह मंगळवारी पित्याच्या लखनौमधील शासकीय निवासस्थानी संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृत्यूमागचे नेमके कारण लगेच सांगता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. व्यापमं घोटाळ्यात आरोपी म्हणून नाव आल्यापासून शैलेश प्रचंड तणावाखाली होता. हा तणावच त्याच्या मृत्यूचे कारण असण्याची शक्यता आहे’, असे काँग्रेसचे नेते सत्यदेव त्रिपाठी यांनी म्हटले आहे. पोलिसांनी मृत्यूच्या प्राथमिक अंदाजाबाबत मौन बाळगले आहे. राज्यपाल यादव यांच्या लखनौ येथील मॉल एव्हेन्यू भागात असलेल्या शासकीय निवासस्थानी शैलेशचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सीबीआय चौकशीची काँग्रेसची मागणी
शैलेश व्यापमं घोटाळ्यात आरोपी असल्यामुळे त्याच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. मधुमेहग्रस्त शैलेशचा मृत्यू ब्रेन हॅमरेज किंवा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे झाल्याचा प्राथमिक तर्क आहे.
च्व्यापमं घोटाळ्यात शैलेशने १० उमेदवारांची ग्र्रेड-३ शिक्षकपदावर भरती निश्चित केल्याचा आणि त्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशचे माजी मंत्री असलेले यादव यांनी व्यापम घोटाळ्यात आपले नाव सामील करण्याला उच्च न्यायालयात आव्हानही दिलेले आहे.