लग्नाच्या आदल्या रात्री तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मंदिराजवळ सापडला मृतदेह, हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:41 PM2021-10-26T12:41:14+5:302021-10-26T12:43:15+5:30
Himachal Pradesh News: लग्नाच्या एक दिवस आधी एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाचा Death News: मृतदेह मंदिराजवळ सापडला. ही घटना हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात घडली आहे.
चंबा (हिमाचल प्रदेश) - लग्नाच्या एक दिवस आधी एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाचा मृतदेह मंदिराजवळ सापडला. ही घटना हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात घडली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर विवाहाच्या एक दिवस आधीच तरुणाचा मृत्यू झाल्याने कुटुंबातील आनंदाचे वातावरण शोकामध्ये बदलले.
मिळालेल्या माहितीनुसार चंबा जिल्ह्यातील डलहौस पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मॅगजिन गावामध्ये रविवारी एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला. मृत ३० वर्षिय बलबीर सिंग हा बेली पंचायतीमधील ढुंढीयारा गावातील होता. तसेच पीडब्ल्यूडी विभागात नोकरी करत होता.
हा तरुण बेपत्ता झाल्यानंतर बाबा लखदाता मंदिराजवळ तो पडलेला असल्याचे पाहण्यात आले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हा तरुण काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता. सोमवारी या तरुणाचं लग्न होतं आणि घरामध्ये संपूर्ण तयारी झाली होती, अशी माहिती समोर आली.
पोलिसांनी डलहौसीमधील रुग्णालयात सदर तरुणाचे पोस्टमार्टेम केल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवला आहे. रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोस्टमार्टेमचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या कारणांचा नेमका खुलासा होणार आहे. मात्र या तरुणाचा पडल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दु:खद बाब म्हणजे बलबीर याच्या आई-वडिलांचे आधीच निधन झालेले आहे. आता त्याच्या कुटुंबात दोन भाऊ आणि बहीण आहे. आई-वडिलांपाठोपात भावाचाही मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना शोक अनावर झाला आहे. या घटनेनंतर कुटुंबावर शोकाचे वातावरण आहे. गावाचे उपसरपंच मोहन कुमार यांनी सांगितले की, सोमवारी बलबीर याचा विवाह होता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत बलबीर घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र रात्री उशिरापर्यंत काही माहिती मिळाली नाही. अखेरीस त्याचा मृतदेह हाती लागला.