सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून संशयास्पद औषधे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 06:14 AM2023-03-12T06:14:33+5:302023-03-12T06:15:51+5:30
सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस सविस्तर शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक सतीश कौशिक ज्या फार्म हाऊसमधील पार्टीत सहभागी झाले होते तेथून दिल्लीपोलिसांनी काही संशयास्पद औषधे जप्त केली आहेत. या पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
कौशिक यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस सविस्तर शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. कौशिक बुधवारी दक्षिण पश्चिम दिल्लीतील एका फार्महाऊसमध्ये आयोजित पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीमध्ये १५ ते २० जण सहभागी झाले होते. फार्महाऊसमधून पोलिसांनी काही औषधे जप्त केली आहेत. ही औषधे कोणासाठी आणली होती, याचा तपास करण्यात येत आहे. तसेच या पार्टीत सहभागी झालेल्या पाहुण्यांची यादीही तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात कौशिक यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. ‘तेरे नाम’ आणि ‘मुझे कुछ कहना है’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे कौशिक यांच्या पश्चात पत्नी शशी आणि मुलगी वंशिका असा परिवार आहे.
कौशिक (वय ६६) यांचे गुरुवारी सकाळी गुरुग्राम येथील रुग्णालयात नेण्यात येत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. बुधवारी रात्री प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयामध्ये नेण्यात आले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"