UP Election 2022: “PM मोदींच्या रॅलीला गर्दी जमा करणे एवढेच CM योगी आदित्यनाथांचे काम राहिलेय का?”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 09:36 AM2022-01-02T09:36:04+5:302022-01-02T09:37:09+5:30

UP Election 2022: उत्तर प्रदेशमधील प्रशासकीय नेमणुकांबाबत योगी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

swami chinmayananda criticized cm yogi adityanath and centre modi govt over administrative appointment | UP Election 2022: “PM मोदींच्या रॅलीला गर्दी जमा करणे एवढेच CM योगी आदित्यनाथांचे काम राहिलेय का?”

UP Election 2022: “PM मोदींच्या रॅलीला गर्दी जमा करणे एवढेच CM योगी आदित्यनाथांचे काम राहिलेय का?”

googlenewsNext

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची (UP Election 2022) धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. हळूहळू प्रचारसभांना वेग येत असून, सर्वपक्षीयांनी या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावल्याचे दिसत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे, हाच मुख्य अजेंडा या निवडणुकीसाठी विरोधकांचा असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे उत्तर प्रदेशमधील दौरे आणि प्रचारसभा वाढत चालल्या आहेत. यातच पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभांना गर्दी जमवणे एवढेच आता मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचे काम राहिले आहे का, अशी थेट विचारणा करण्यात आली आहे. 

भाजपचे माजी खासदार आणि माजी गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांनीच आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. स्वामी चिन्मयानंद तीनवेळा भाजपच्या तिकिटावर यापूर्वी निवडून आले आहेत. स्वामी चिन्मयानंद यांनी फेसबुक पोस्ट लिहिली असून, यामध्ये योगी आदित्यनाथ सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. स्वामी चिन्मयानंद यांचा मुख्य रोख हा प्रधान सचिवांच्या नेमणुकीवर आहे. तसेच चिन्मयानंद यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला.

मोदींच्या रॅलीला गर्दी जमवणे एवढेच योगींचे काम राहिलेय का?

स्वामी चिन्मयानंद यांनी निवृत्त होत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या सेवेचा विस्तार करत त्यांना प्रधान सचिव केल्याबाबत योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान मोदी आता केंद्राच्या विविध विभागांप्रमाणे उत्तर प्रदेश शासनही यांच्याच जीवावर चालवणार का, असा सवाल स्वामी चिन्मयानंद यांनी केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रशासकीय स्तरावर केलेले बदल आश्चर्यकारक आहेत. प्रधान सचिवपदी नेमणूक करण्यासाठी अनेक योग्य अधिकारी प्रशासनात आहेत. मात्र, निवृत्त होत असलेल्या अधिकाऱ्याचा सेवा विस्तार करून त्यांना प्रधान सचिव करणे कितपत योग्य आहे, अशी विचारणा चिन्मयानंद यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभा, रॅलींना गर्दी जमवणे एवढेच काम योगी आदित्यनाथ यांचे राहिले आहे का, असा रोखठोक सवालही त्यांनी यावेळी केला. 

आपल्या विधानाबाबत दिले स्पष्टीकरण

स्वामी चिन्मयानंद यांनी फेसबुक पोस्ट त्यांनीच लिहिल्याचे मान्य केले असून, निवृत्त अधिकाऱ्याला प्रधान सचिवपदी नेमणूक करण्याबाबत कोणताही आक्षेप नाही. या नेमणुकीला माझा विरोधही नाही. मी कोणत्याही व्यवस्थेचा विरोध केलेला नाही. मात्र, अन्य योग्य अधिकारी असतानाही निवृत्तीच्या केवळ दोन दिवस आधी सेवा विस्तार करून अशा प्रकारे नेमणुका होत असल्याबाबत मत मांडले आहे, असे स्पष्टीकरण स्वामी चिन्मयानंद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.
 

Web Title: swami chinmayananda criticized cm yogi adityanath and centre modi govt over administrative appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.