स्वामी शिवानंद : रोज योगासने करणारी १२४ वर्षांची जगातील सर्वांत आनंदी व्यक्ती!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 06:31 AM2020-06-23T06:31:01+5:302020-06-23T06:31:14+5:30
आजही ते रोज तब्बल दोन तास योगासने करतात. त्यामुळेच मला दीर्घायुष्य लाभले आहे, असे अभिमानाने सांगतात.
चेन्नई : जगभरातील सर्व लोक कोरोनाच्या संकटाने हादरून गेले आहेत. प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती आहे. पण १२४ वर्षे वयाचे स्वामी शिवानंद अत्यंत आनंदाने आयुष्य जगत आहेत. त्यांना कोरोनाच काय, कसलीच भीती नाही. आजही ते रोज तब्बल दोन तास योगासने करतात. त्यामुळेच मला दीर्घायुष्य लाभले आहे, असे अभिमानाने सांगतात.
त्यांचा जन्म ८ आॅगस्ट १८९६ रोजीचा. त्या काळात जन्मनोंद करण्यासाठी तशी यंत्रणा नव्हती. पण मंदिरात त्यांच्या जन्माचा उल्लेख आहे. रोज दोन तास योगाभ्यास, दोन वेळा पोळी, भाजी, भात आणि वरण वा सांबार असे जेवण. बाकीचा सारा वेळ ते गीतापठनात जातो. योगाभ्यासामुळे मानसिक समाधान आणि आनंद मिळतो, असे ते अभिमानाने सांगतात.
ते त्यांनी सांगायची गरजच नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सारे काही सांगतो. योगासने केल्यामुळे मला कोणतीही इच्छा (डिझायर), आजार (डिसिज) वा नैराश्य (डिप्रेशन) कधीच जाणवले नाही. या तीन ’डी’ ना माझ्या आयुष्यात स्थानच नाही. मला सारा आनंद मिळतो तो योगासनांतून, असे त्यांचे म्हणणे.
त्यांना योगाभ्यासाच्या निमित्ताने आॅस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, लक्झेम्बर्ग, नेदरलँड अशा अनेक देशांचा दौरा केला आहे. तब्बल ५0 देशांना त्यांनी योगासनांची ओळख करून दिली. त्यांनी एकोणिसावे, विसावे व एकविसावे अशी तीन शतके पाहिली आहेत. मी जगातील सर्वात वृद्धच नव्हे, तर सर्वात आनंदी माणूस आहे, असे ते सांगतात. त्यांनी या प्रदीर्घ आयुष्यात प्लेग, फ्लू आणि आता कोरोना अशा भयानक साथी पाहिल्या आहेत.पण त्यांना मात्र कधीही कसलाच आजार झालेला नाही. इतके आयुष्य आणि तेही अतिशय आनंदाचे मिळावे असे अनेकांना वाटते. पण त्यासाठी स्वामी शिवानंद यांनी ज्या गोष्टींचे आचरण केले, ते करणे मात्र अजिबात सोपे नाही. अनेक जण त्यांच्या जन्मतारखेबाबत शंका उपस्थित करतात. त्यांच्या आधार कार्ड आणि पासपोर्टवर ८ आॅगस्ट १८९६ हीच जन्मतारीख आहे. ते विमानाने प्रवास करतात. विमान कंपन्यांचे कर्मचारी आणि प्रवासीही त्यांचा उत्साह पाहून थक्क होतात. स्वामी शिवानंद म्हणतात, ‘‘माझ्या जन्मतारखेबाबत कोणाला शंका असेल, तर त्यांनी माझी डॉक्टरांमार्फत हवी ती तपासणी करावी. मी १२४ वर्षांचा नाही, हे डॉक्टरांनी सिद्ध करून दाखवावेच.’’